अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात अडकलेले ३१ हजार रुपयांच्या वैद्यकीय देयकावर अधिकाऱ्यांची स्वाक्षरी आणण्यासाठी तीन हजारांच्या लाचेची मागणी करणाºया मात्र लाचेची रक्कम न स्वीकारणाºया सर्वोपचार रुग्णालयातील सेवानिवृत्त सफाई कामगाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी दुपारी अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची रवानगी कारागृहात केली आहे.तक्रारदाराच्या ३१ हजार ४०० रुपयांच्या बिलावर वैद्यकीय अधिकाऱ्यांची स्वाक्षरी आणण्यासाठी तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी आरोपी शेख उस्मान शैख शबीर (५१) या सेवानिवृत्त सफाई कामगार, (खासगी इसम) शासकीय सर्वोपचार रुग्णालयात केली होती; मात्र तक्रारदारास लाच देणे नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी २० डिसेंबर २०१९ रोजी करण्यात आली होती. पडताळणीनंतर शुक्रवारी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला असता शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील पिंपळाच्या झाडाजवळ आरोपी तक्रारदाराकडून लाच स्वीकारणार तोच त्याला संशय आल्याने त्याने रक्कम स्वीकारली नाही; मात्र पथकाने आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे, पोलीस उपअधीक्षक एस. एस. मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अभय बाविस्कर व नीलेश शेगोकार यांनी केली.