अकोला: बोरगाव मंजू येथील सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मणराव खांदेल यांनी मोर्णा नदीच्या विकासासाठी आपल्या निवृत्तीवेतनातून रुपये दोन हजाराचा धनादेश आज जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्याकडे सुपूर्द केला.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात पार पडलेल्या या कार्यक्रमप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी खांदेल यांची आस्थेने चौकशी केली. त्यांनी दिलेल्या निधीचा विनीयोग मोर्णा नदी काठी सध्या सुरु असलेल्या विकास कामांसाठी केला जाणार आहे. जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचे वैभव असणाऱ्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेला दि. 13 जानेवारीपासून प्रारंभ झाला. सुमारे 14 टप्प्यात पार पडलेल्या या मोहिमेमुळे मोर्णाचा कायापालट झाला आहे. लोकसहभागातून ही नदी मोठया प्रमाणात स्वच्छ करण्यास यश मिळाले आहे. मोर्णाच्या स्वच्छतेबरोबरच जिल्हा प्रशासनाने मोर्णाचा विकास करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या कामासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी आपले योगदान देण्याचा निश्चय केला. लोकप्रतिनिधी, अधिकारी, प्रतिष्ठीत नागरिक यांनी मोर्णाच्या विकासासाठी सढळ हाताने निधी दिल्याने नदीकाठी विविध विकास कामांना गती आली आहे.