अकोला : ऑनलाइन फसवणुकीच्या माध्यमातून बँक खात्यातून परस्पर रक्कम काढण्यात आल्याची तक्रार सायबर पोलिसांकडे करण्यात आल्यानंतर या गुन्ह्याचा छडा लावून पोलिसांनी ३७ हजार ३०० रुपयांची रक्कम तक्रारदारास परत मिळवून दिली आहे.
अंकुश गजानन गावंडे रा. सांगवी खुर्द यांना ३० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास एका अनोळखी नंबरहून फोन आला की, त्यांना मोफत बजाज फायनान्सचे क्रेडिट कार्ड मिळणार आहे. त्यासाठी त्यांना मोबाइलमध्ये क्विक सपोर्ट नावाचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागणार व त्यानंतर त्यांच्या अकाऊंटमधून फायनान्सच्या अकाऊंटमध्ये पाच रुपये टाकावे लागणार. अंकुश यांनी त्यांच्या म्हणण्यानुसार ॲप्लिकेशन डाऊनलोड केले व बजाज फायनान्सच्या अकाऊंटमध्ये पाच रुपये टाकले असता त्यांचे अकाऊंटमधून ३५ हजार रुपये रक्कम काढण्यात आली. दुसरी तक्रार विपुल पाठक (रा. डाबकी रोड) यांनी ६ जानेवारी रोजी केली होती. त्यांना एका अनोळखी नंबरहून फोन आला होता की त्यांना पेटीएम या ऑनलाइन पोर्टलवर चार हजार रुपये कॅशबॅक आले आहेत. त्याकरिता तुमच्या पेटीएम अकाऊंटवर आलेल्या लिंकवर क्लिक करून तुमचा पासवर्ड टाका, असे सांगितले. पाठक यांनी तसे केल्यानंतर त्यांच्या अकाऊंटमधून ३० हजार रुपये रक्कम काढण्यात आली होती. दोन्ही तक्रारींचा तपास करताना पोलिसांनी पेटीएम आणि बजाज फायनान्स याचा सखोल तपास केला असता रक्कम परत करण्यात पोलिसांना यश आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबरचे पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पीएसआय दीपक सोळंके, अतुल अजने, गोपाल ठोंबरे, आशिष आमले, राहुल देवीकर यांनी केला.