खामगाव (जि. बुलडाणा) : पीक विम्याच्या रक्कमेचा विड्रॉल दिल्यानंतर बँकेने शेतकर्यांच्या हातातील रक्कम परत घेवून कर्जखात्यात जमा केली. तसेच विड्रॉल रद्द केला व शेतकर्याला परत पाठविले. हा प्रकार स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शहरातील बँक ऑफ इंडिया शाखेत घडला. याप्रकरणी शेतकर्याने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून न्याय मागितला आहे. तालुक्यातील काळेगाव येथील शेतकरी विश्वनाथ काशिनाथ फुकट यांच्याकडे अडीच एकर शेती असून त्यांनी पिकाचा विमा काढला होता. पिकाचे नुकसान झाल्याने त्यांना भरपाईपोटी ६ हजार रुपये मंजूर झाली. सदरची रक्कम त्यांच्या बँक ऑफ इंडिया या शाखेत जमा झाली होती. ही रक्कम जमा झाल्याचे समजल्यानंतर विश्वनाथ फुकट हे आर्थिक अडचणीमुळे १४ ऑगस्ट रोजी बँकेत पैसे काढण्यास आले. विड्रॉल भरुन त्यांनी पैसे घेतले; मात्र पैसे दिल्याचे समजल्यानंतर विश्वनाथ फुकट यांच्याकडे कर्ज थकीत असल्याचे बँक अधिकार्यांना लक्षात येताच त्यांच्या हातातील रक्कम परत घेऊन विड्रॉल रद्द करण्यात आला. तसेच सदरची रक्कम त्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आली. पीक विमा रक्कमेतून कर्ज कपात करु नये, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून पीक विम्याची रक्कम शेतकर्यांचा कर्जखात्यात वळती करण्यात येत आहे. यामुळे शेतकरी रोष व्यक्त करीत आहेत.
खात्यातून काढलेले विम्याचे पैसे घेतले परत
By admin | Published: August 14, 2015 10:57 PM