अकोला : आॅनलाइन खरेदी तसेच विविध मदतीसाठी अॅप डाउनलोड केल्यानंतर त्यांनी सांगितलेली प्रक्रिया करणाऱ्या अनेकांची आॅनलाइन फसवणूक केल्यानंतर त्यांनी अकोला सायबर सेलकडे तक्रार करताच सायबर सेलने अशा विविध प्रकरणात गत काही दिवसात तब्बल तीन लाख ५० हजार रुपयांची रक्कम तक्रारदारांना परत मिळवून देण्याची कारवाई केली. यासोबतच आॅनलाइन खरेदी तसेच हॅकर्सपासून सावधान राहण्याचे आवाहन सायबर सेल तसेच स्थानिक गुन्हे शाखेने केले आहे.जठारपेठ येथील रहिवासी प्रसाद कुलकर्णी यांनी एका आॅनलाइन साईटवरून शॉपिंग केली. यामध्ये आॅनलाइन विकत घेतलेले शर्ट हे निकृष्ट दर्जाचे निघाले. त्यामुळे प्रसाद यांनी गुगलवरून कंपनीचा कस्टमर केअर नंबर शोधून त्यावर संपर्क साधला. कस्टमर केअरमधील व्यक्तीने पैसे परत करण्याचे सांगत एक अप्लीकेशन डाउनलोड करायला सांगितले. त्यानंतर बँक डिटेल्स घेऊन कुळकर्णी यांच्या बँक खात्यातून १५ जुलै रोजी एक लाख रुपये परस्पर काढले. हा प्रकार प्रसादच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. सायबर पोलिसांनी तांत्रिक मदतीच्या आधारावर ६० हजार रुपये परत मिळविले तसेच ४० हजार रुपये मिळविण्यासाठी सायबर पोलीस ठाण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसºया प्रकरणात चंद्रकांत दादाराव धोटे यांचे ७ जुलै रोजी फोन पे चे खाते बंद होणार असल्याचे सांगत त्यांच्या खात्यातील १० हजार रुपयांची रक्कम काढण्यात आली होती. फसवणूक झाल्याचे धोटे यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने सायबर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. यावरून सायबर पोलिसांनी काही वेळातच त्यांची १० हजार रुपयांची रक्कम परत मिळवून दिली. या दोघांसोबतच गत तीन महिन्यात आॅनलाइन फसवणूक झालेली तीन लाख ५० हजार रुपयांची रक्कम परत आणण्यात अकोला सायबर पोलिसांना यश आले आहे.