अकाेला: शहरातील मालमत्तांचे ‘जीआयएस’प्रणालीद्वारे पुनर्मुल्यांकन केले जाणार असून याकरीता महापालिका प्रशासनाने स्वाती इन्डस्ट्रीजसाेबत करारनामा केला आहे. प्रशासनाने एजन्सीला वर्क ऑर्डर जारी केली असून पुनर्मुल्यांकनासाठी एक वर्षांची अट नमुद करण्यात आली आहे.
महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशातून तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी सन २०१६ मध्ये हद्दवाढ क्षेत्रासहीत शहरातील मालमत्तांचे ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे पुनर्मुल्यांकन केले हाेते. त्यासाठी खासगी एजन्सी नियुक्ती केली हाेती. या प्रक्रियेनंतर मनपा प्रशासनाने २०१७ मध्ये सुधारित करवाढ लागू केली असता, वर्षाकाठी ७८ काेटी रुपये उद्दिष्ट निश्चित करण्यात आले हाेते. निकषानुसार दर पाच वर्षांनंतर मालमत्तांचे पुनर्मुल्यांकन करणे क्रमप्राप्त आहे. २०२२ राेजी ही मुदत संपुष्टात आल्यामुळे महापालिकेने पुनर्मुल्यांकनासाठी निविदा अर्ज मागितले. यामध्ये झारखंड मधील रांची येथील स्वाती इन्डस्ट्रीज व स्पॅराे साॅफ्टवेअर प्रायव्हेट लिमीटेड कंपनीचे अर्ज प्राप्त झाले हाेते. यापैकी स्वाती इन्डस्ट्रीजची निविदा मंजूर करुन त्यांना कार्यारंभ आदेश दिले आहेत.
पाणीपट्टी, बाजार वसूली करणार
जलप्रदाय विभागालामार्फत वसूल केली जाणारी पाणीपट्टी, बाजार व परवाना विभागाकडून हाेणारी दैनंदिन बाजार वसूली, हाेर्डिंगपासून मिळणारे उत्पन्न आदी सर्व कामे एजन्सीकडे सुपूर्द करण्यात आली आहेत.