लोकमत इफेक्ट
खेट्री : आलेगाव वन परिक्षेत्र कार्यालयांतर्गत शिरपूर परिसरात हिरव्या वृक्षांची कत्तल होत असल्याचे उघड झाल्यावरही दंडात्मक कारवाई करण्याऐवजी प्रकरण थंड बस्त्यात ठेवण्यात आल्याचे वृत्त दि. ३ फेब्रुवारी रोजीच्या अंकात प्रकाशित करताच संबंधित विभागाला जाग येऊन दि. ९ फेब्रुवारी रोजी तलाठ्यांनी परिसरात जाऊन पंचनामा केला. याप्रकरणात अहवाल तयार करून आलेगाव वन विभागाकडे सादर केल्याची माहिती आहे. या अहवालावर ज्या शेतकऱ्यांच्या शेतात वृक्षांची कत्तल झाल्याचे उघडकीस आले, त्या शेतकऱ्यावर वन विभाग दंडात्मक कारवाई करणार असल्याचे आलेगाव वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी सतीश नालींदे यांनी सांगितले.
पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी एकीकडे शासन वृक्षलागवडीच्या विविध योजना राबवून कोट्यावधी रुपये खर्च करीत आहे. दुसरीकडे, आलेगाव वन व महसूल विभागाच्या दुर्लक्षतेमुळे भरदिवसा अवैध वृक्षतोड सुरू आहे. आलेगाव वनपरिक्षेत्रातील शिरपूर परिसरात वृक्षांची सर्रास कत्तल करून वाहतूक केली जात असल्याबाबतचे वृत्त लोकमत'ने २३ जानेवारी रोजीच्या अंकात प्रकाशित करताच संबंधित आलेगाव वन विभागाने दि. २३ जानेवारी रोजी आलेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश नालिंदे यांच्या आदेशानुसार वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शिरपूर परिसर पिंजून काढला असता, शेकडो हिरव्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड होत असल्याचे उघडकीस आले होते. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शेकडो हिरव्या वृक्षांची कत्तल झाल्याचे उघडकीस आल्यावर आलेगाव वन विभागाच्या वन परिक्षेत्र अधिकारी सतीश नालिंदे यांनी ज्या शेतकऱ्यांच्या शेतात वृक्षांची कत्तल झाली. त्या शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आली होती, परंतु दहा दिवसाचा कालावधी उलटूनही कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आली नव्हती. याबाबत ३ फेब्रुवारी रोजीच्या अंकात बातमी प्रकाशित करताच संबंधित विभाग खडबडून जागा झाला आणि तलाठ्यांनी पंचनामा करून अहवाल आलेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे सादर केला आहे.सदर अहवालावर ज्या शेतकऱ्यांच्या शेतात वृक्षांची कत्तल झाली त्या शेतकऱ्यावर दंडात्मक कारवाई होणार असल्याचे आलेगाव वन विभागाने सांगितले आहे.