मूर्तिजापूर : पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे महिलांसह सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने नागरिक वैतागले आहेत. महागाईवर नियंत्रण ठेवावी, केंद्र, राज्य शासनाने इंधन दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष संजय भोलाशंकर गुप्ता यांनी उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, तहसीलदार पवार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. इंधन दरवाढ कमी न केल्यास संभाजी ब्रिगेडतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून दिला आहे.
संभाजी ब्रिगेडने दिलेल्या निवेदनानुसार, पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत प्रचंड दरवाढ केल्यामुळे महिलांचे बजेट कोलमडले आहे. तसेच सामान्य नोकरदारवर्ग त्रस्त झाला आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या संकटामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेलचे दर तत्काळ कमी करावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेड मूर्तिजापूरचे विभागीय कार्याध्यक्ष संजय भोलाशंकर गुप्ता यांनी निवेदनातून केली आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री बच्चू कडू, जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर, विभागीय आयुक्त अमरावती, खासदार संजय धोत्रे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविल्या आहेत.
------------------
किराणा साहित्यही महागाले!
पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने किराणा साहित्यही महागले आहे. केवळ स्वस्त धान्य दुकानातून धान्य मोफत उपलब्ध करून दिल्याने उपयोग नाही, असे मत संभाजी ब्रिगेडने दिलेल्या निवेदनातून मांडले आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलची वाढलेली दरवाढ मागे घेऊन सर्व सामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.