अकोला: कृषी संशोधकांनी केलेल्या संशोधनाचा आढावा राज्यातील कृषी विद्यापीठ स्तरावर घेतला जाणार आहे. यावर्षीचा ‘ज्वॉइंट अॅग्रोस्को’ राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात होणार असल्याने शास्त्रज्ञांनी संशोधन सादरीकरणाची तयारी सुरू केली आहे.राज्यातील कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ वेगवेगळ््या पिकांचे बियाणे, तंत्रज्ञान विकसित करीत असतात. शेती विकासाला लागणाऱ्या तंत्रज्ञानाच्या शिफारशींचा यामध्ये समावेश असतो. मागच्या वर्षी अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ३६ च्यावर तंत्रज्ञानाच्या शिफारशी, तर पाचच्या वर नवीन पिकांचे बियाणे, फुलांच्या जाती विकसित केल्या होत्या. यावर्षी यापेक्षा अधिक शिफारशी व बियाणे विकसित करण्यात आल्याचे कृषी विद्यापीठ सूत्राने सांगितले. वर्षभर संशोधन केल्यानंतर संशोधकांना राज्यस्तरीय ‘ज्वॉइंट अॅग्रोस्को’ची प्रतीक्षा असते. तथापि, याअगोदर कृषी विद्यापीठ स्तरावर संशोधकांच्या संशोधनाचे सादरीकरण बघितले जाते. त्यावर १२ दिवस सूक्ष्म अवलोकन, चर्चा झाल्यानंतर ते पुढे पाठवायचे की नाही, यावर मंथन केल्या जाते. नंतरच राज्यस्तरीय संशोधन आढावा समितीकडे ज्वॉइंट अॅग्रोस्कोत पाठविले जाते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात १ एप्रिलपासून १२ एप्रिलपर्यंत संशोधनाचा आढावा घेतला जाणार आहे.