अकोला : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने अकोला मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी बी. ज्योतिकिरण यांची भारत निवडणूक आयोगाने नियुक्ती केली असून, त्या गुरूवारी जिल्ह्यात दाखल झाल्या. त्यांनी शुक्रवार, दि.२९ मार्च रोजी सकाळी नियोजनभवन येथे बैठक घेऊन निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतला.
याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार, 'स्वीप'च्या नोडल अधिकारी बी. वैष्णवी, आदर्श आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर यांच्यासह सर्व सहायक निवडणूक अधिकारी, तसेच नोडल अधिकारी उपस्थित होते.
निवडणूक खर्च निरीक्षकांनी सर्व सहायक निवडणूक अधिकारी व नोडल अधिका-यांकडून निवडणूकीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली. निवडणूक काळात प्रलोभन दाखविण्यासाठी साड्या, मद्य, वस्तू, पैसे यांचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे सजग राहून अशा बाबींना तत्काळ निर्बंध घालावा व संबंधितांवर कारवाई करावी. उमेदवाराकडून प्रचारासाठी केल्या जाणा-या प्रत्येक खर्चाची काटेकोरपणे नोंद घ्यावी. निवडणूक आयोगाच्या निर्देश व सूचनांचा कुठेही भंग होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असे निर्देश खर्च निरीक्षकांनी दिले.
निवडणूक खर्च संनियंत्रणासाठी लेखा पथके, निरीक्षण पथके, भरारी पथके, व्हिडीओ देखरेख पथके, तसेच लेखा, कॅश, बँक रजिस्टर, विवरणपत्रे, शॅडो रजिस्टर, माध्यम खर्च संनियंत्रण अहवाल, प्राप्तीकर विभाग, तसेच बँकांकडून प्राप्त अहवाल आदींबाबत माहिती खर्च निरीक्षकांनी यावेळी यंत्रणेकडून घेतली.