अकोला : १९५२ च्या पहिल्या निवडणुकीपासून मतदान करणारे ९५ वर्षीय फत्तुजी नथ्थुजी तायडे(रा. सिंधी कॅम्प) यांनी, प्रकृती बरी नसतानाही, पायांनी चालता येत नसतानाही व्हिलचेअरवर येऊन मुलगा नागपूर येथील जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे यांच्या मदतीने गुरूवारी १७ व्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा गुरूनानक विद्यालय मतदान केंद्रावर मतदान केले. यावेळी लोकमतने त्यांच्याशी संवाद साधला.
फत्तुजी नथ्थुजी तायडे हे सिंधी कॅम्प परिसरात राहणारे. ९५ वर्षीय फत्तुजी तायडे यांनी १९५२ च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा मतदान केले होते. तेव्हापासून फत्तुजी यांनी एकही निवडणुक चुकविली नाही. प्रत्येक निवडणुकीत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. गुरूवारी त्यांची प्रकृती बरी नसताना, सुद्धा त्यांचा मुलगा नागपूर येथील जिल्हा पुरवठा अधिकारी असलेले भास्कर तायडे हे त्यांना सिंधी कॅम्प परिसरातील गुरूनानक मतदान केंद्रावर घेऊन आले होते. व्हिलचेअरवर येत, त्यांनी, मतदानाचा हक्क बजावला.
फत्तुजी तायडे यांनी लोकमतशी बोलताना, लोकशाहीने मतदान करण्याचा दिलेला हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे. एकही निवडणुक अशी नाही की, त्यात मी मतदान केले नाही. यंदा प्रकृती बरी नाही. पायांनी चालता येत नाही. परंतु मतदान करण्याची इच्छा असल्यामुळे मुलाने व्हिलचेअरवर आणले आणि मतदान केले. असे सांगत, त्यांनी, आमच्या काळामध्ये निवडणुकीविषयी फारसी जागृती नव्हती. मतदारांची संख्याही फार नव्हती. मोजकेच मतदान केंद्र असायचे. मतदान केंद्रांवर फार सुविधा नव्हत्या. परंतु मतदान करायचेच ही जाणीव मात्र, त्याकाळी होती. उत्साह होता. मुद्यांना आणि मतदारांना केंद्रस्थानी ठेऊन निवडणुक व्हायची. त्याकाळात जात, धर्म हा विषय निवडणुकीत नव्हता आणि आताच्या निवडणुकीमध्ये जात, धर्म, पैशाला महत्व आले आहे. याचा खेद वाटतो. (प्रतिनिधी)