- प्रवीण खेतेअकोला : तृतीयपंथी विशेषत: ट्रान्स जेंडरमध्ये एचआयव्हीचा धोका सर्वाधिक वाढत आहे. अकोल्यातील गुणवंत शिक्षण संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, अकोला जिल्ह्यात ८० ते ९० ट्रान्स जेंडर असून, त्यापैकी ३७ जण, इतर तृतीयपंथी मिळून एकूण ४४ जण ‘एचआयव्ही’ग्रस्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तृतीयपंथींच्या इतर प्रकारांमध्ये ५१० पेक्षा जास्त जणांची एचआयव्ही चाचणी करण्यात आली आहे.‘एड्स’ नाव ऐकताच मनात भीती अन् अनेक समज-गैरसमज निर्माण होतात. राज्यात एड्सवर प्रतिबंध घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा व ग्रामीण स्तरावर एचआयव्ही तपासणी व औषधोपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय, गत काही वर्षांपासून त्यावर मोठ्या प्रमाणात जनजागृतीही झाली आहे. परिणामी, काही प्रमाणात या आजारावर प्रतिबंध घालण्यात यश आले आहे; मात्र तृतीयपंथींपर्यंत पोहोचण्यासाठी आरोग्य यंत्रणेला मोठी कसरत करावी लागत असल्याने त्यांच्यात एचआयव्हीची समस्या गंभीर रूप धारण करीत आहे. असे असले तरी अकोल्यातील गुणवंत शिक्षण संस्था गत काही वर्षांपासून तृतीयपंथींमध्ये एचआयव्हीबाबत जनजागृतीचे कार्य करीत आहे. याच माध्यमातून जिल्ह्यातील जवळपास ५१३ तृतीयपंथींच्या एचआयव्ही चाचण्या करण्यात आल्या असून, यातील ४४ जणांना एचआयव्ही असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हीच स्थिती राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणात असून, त्याचे सर्वेक्षण केल्यास एक गंभीर समस्या समोर येऊ शकते, यात शंका नाही.शोधमोहिमेसाठी विशेष पथकतृतीयपंथींमध्ये एचआयव्हीचा वाढता धोका नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेतर्फे विशेष पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. हे पथक तृतीयपंथींचा शोध घेऊन एड्सबद्दल जनजागृती करीत त्यांची स्क्रीनिंग टेस्टही करून घेतली जात असल्याची माहिती जिल्हा एड्स नियंत्रण कक्षेचे दर्शन जनईकर यांनी सांगितली.गत काही वर्षांपासून गुणवंत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तृतीयपंथींमध्ये एड्सबाबत जनजागृतीचे कार्य सुरू आहे. यातूनच केलेल्या एका सर्वेक्षणातून ट्रान्स जेंडरमध्ये एचआयव्हीचे वाढते प्रमाण असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या वर्गातही एचआयव्हीबाबत जनजागृतीसाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.- अरुंधती शिरसाट, गुणवंत शिक्षण संस्था, अकोला.