अकोला :कपाशीवर गुलाबी बोंडअळी येण्याचा धोका वाढला असून, इतर ठिकाणी प्रसार होऊ नये, यासाठी कृषी विभागासह शेतकऱ्यांनी तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाने राज्यात ‘अलर्ट’ जारी केला आहे.यावर्षी सुरुवातीच्या काळात पाऊस चांगला पडल्याने पीक चांगले आले; परंतु परतीच्या पावसाने कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले. काही भागात मात्र पाण्याचा निचरा झालेल्या हलक्या शेतातील कपाशीला फुले, पाती व बोंडे लागली आहेत. त्यावर बोंडअळीचा धोका वाढला असल्याचे कृषी विद्यापीठाने जारी केलेल्या अलर्टमध्ये म्हटले आहे. या कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरील तीन एकर कपाशी पिकामध्ये बोंडअळीच्या सर्वेक्षणासाठी चार कामगंध सापळे लावण्यात आले होते. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कामगंध सापळ्यात बोंडअळ्यांच्या पतंगांची संख्या नगण्य होती. तसेच किडीचा प्रादुर्भावदेखील नव्हता. ११ ते १६ नोव्हेंबरपर्यंत चारही कामगंध सापळ्यांत १ हजार ७८ पतंग आढळून आले. तसेच १० ते १५ किलोमीटर अंतरावरही लावलेल्या कामगंध सापळ्यातही गुलाबी बोंडअळीच्या पतंग आढळून आले. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतामध्ये १० टक्क्यांच्यावर कपाशीवर या बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळला आहे.बोंडअळीसाठी सद्यस्थितीत पोषक वातावरण असल्याने गुलाबी बोंडअळीचे पतंग बाहेर निघाले आहेत. हीच स्थिती सर्वदूर कपाशीमध्ये येण्याची शक्यता आहे. कोषातून बाहेर निघालेले पतंग मिलन होऊन अंडी घातल्यानंतर ८ ते १० दिवसांनंतर त्यांचा प्रादुर्भाव कपाशीला जेथे हिरवी बोंडी व पात्या आहेत, त्या ठिकाणी येण्याची सर्वाधिक शक्यता आहे. हा धोका टाळण्यासाठी शेतकºयांनी कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार उपाययोजना करण्याची गरज आहे.सर्वेक्षणात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचे पतंग निदर्शनास आले असून, हीच परिस्थिती इतर भागात असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने कृषी आयुक्तालय पुणे व कृषी विभागाला ही माहिती देण्यात आली आहे. बोंडअळी दिसल्यास शेतकºयांनी कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार उपाययोजना करावी.
- डॉ. डी. बी. उंदिरवाडे,विभाग प्रमुख,कीटकशास्त्र,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.