अकोला : आरोग्य विभागाच्या निरंतर प्रयत्नानंतरही ‘स्क्रब टायफस’ हळूहळू पाय पसरत असून, या आजाराचा आणखी एक संभाव्य रुग्ण आढळून आला आहे. म्हातोडी येथील एका बालकास या आजाराची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर स्क्रब टायफसचे जिल्ह्यात कन्फर्म - १, संभाव्य - २ व संशयित - ५ अशा एकूण आठ रुग्णांची नोंद आरोग्य विभागाने केली आहे.गवत तसेच उंदरांवर आढळणाऱ्या चिगर माइटस हा कीटक चावल्याने स्क्रब टायफस हा आजार होतो. पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये उद्रेक झाल्यानंतर अकोला जिल्ह्यातही या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. याच मालिकेत १४ सप्टेंबर रोजी आपातापा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत म्हातोडी येथील एका बालकास स्क्रब टायफससदृश लक्षणे आढळून आली. अकोला येथील खासगी रुग्णालयात तपासणी केली असता, स्क्रब टायफस संभाव्य असा अहवाल प्रयोगशाळेद्वारा देण्यात आला. आता या बालकाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती आहे. तत्पूर्वी, जामठी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गतही एक स्क्रब टायफस संभाव्य रुग्ण आढळला आहे.आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनाम्हातोडी येथील बालक स्क्रब टायफस संभाव्य (प्रॉबेबल) आढळून आल्यानंतर खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाने सोमवारपासून या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. आपातापा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावांमध्ये सर्वेक्षण करण्यात आल्याचे सहायक संचालक, आरोग्यसेवा (हि.) डॉ. अभिनव भूते यांनी सांगितले.चिगर कीटकाबाबत संभ्रम‘स्क्रब टायफस’चे रुग्ण वाढत असताना नागरिकांमध्ये आता हा आजार पसरविण्यास कारणीभूत असलेल्या चिगर या कीटकाबाबत धास्ती निर्माण झाली आहे. साध्या कीटकासही आता चिगर समजून लोक घाबरत असल्याचे प्रकार आता समोर येत आहेत. उच्चशिक्षित नागरिकांमध्येही या कीटकाबाबत संभ्रम आहे. साधा किडा चावला, तरी चिगर चावल्याची शंका लोकांना येत असल्याची उदाहरणे आहेत.