आकोट : आकोट तालुक्यात रविवारी सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील नदी-नाले दुथडी भरूनवाहत आहेत. मोहाळी नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने आकोट-हिवरखेड मार्ग बंद पडला तर अंजनगाव मार्गावर झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. काही गावातील नदीकाठच्या घरात व शेतात पाणी शिरले आहे. आकोट शहरातील अनेक चौकात, रस्त्यावर पाणी साचले. आठवडी बाजारसुद्धा मोठय़ा प्रमाणात भरला नव्हता. दरम्यान पावसाचा जोर पाहता महसूल प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.सातपुड्यामधून येणार्या पाण्याने आकोट-हिवरखेड मार्गावरील ५२ नदी-नाल्यांना पूर आला होता. आकोटनजीक मोहाळी नदीला पूर आल्याने हिवरखेड मार्ग बंद पडला होता. दोन्ही बाजूला वाहनाची रांग लागली होती. काही दुचाकी व प्रवाशांनी जीव धोक्यात घालत रेल्वेपुलावरून मार्ग काढला होता. शिवाय अकोट-अंजनगाव राज्य मार्गांवर वृक्ष उन्मळून पडल्यामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती. तालुक्यातील शेतात मोठय़ा प्रमाणात पाणी साचले. गावातील सखल भागात तसेच गावानजीक नाल्यामधून पाणी वाहत होते. आकोट रेल्वेस्टेशनकडे जाणार्या रस्त्यावर पाणी साचले होते तर बसस्थानकजवळील जिजामाता नगर ते हिवरखेड मार्गावर मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते. पाणी वाहून नेणार्या नाल्या कुचकामी ठरल्याने अनेकजण नालीमध्ये पडले. या भागातील घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे नुकसान झाले. शहरातील शौकतअली चौक, सोनू चौक, जिनगरवाडी आदी भागात पाणी साचले होते. शहरातून वाहणार्या लेकुरवाडी नाल्याला पूर आला होता. दरम्यान आज आठवडी बाजार असल्याने आकोट आगारातून सर्व बसेस सोडण्यात आल्या. परंतु, प्रवासी संख्या रोडावली होती. तालुक्यात पुरामुळे बाधित होणार्या केळीवेळी, किनखेड, पळसोद, पनोरी, पिलकवाडी, कुटासा, मुंडगाव, करोडी व आकोट परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार पाटील यांनी सांगितले.
आकोट तालुक्यात नदी-नाल्यांना पूर
By admin | Updated: September 8, 2014 00:05 IST