--------------------
शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ
अकोला : संचारबंदी लागू केल्यानंतरही बाजारातील गर्दी कमी झाली नाही. यामुळे पोलीस विभागाने शहरात मुख्य चौकांमध्ये बंदोबस्त वाढविला आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तरीही, काही नागरिक विनाकारण फिरत असल्याचे चित्र आहे.
-------------------------
उन्हाचा पारा वाढला; शेतीकामे प्रभावित
अकोला : जिल्ह्याचा उन्हाचा पारा चांगलाच वर चढला आहे. रविवारी तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. वाढत्या तापमानाने शेतशिवारातील कामे मंदावली आहेत. भाजीपाला पिकाला याचा मोठा फटका बसला आहे.
-------------------------
एस.टी. वाहतूक थंड; प्रवासी त्रस्त
पातूर : अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद आहेत. यामुळे ग्रामीण भागातून शहराकडे येणारा नागरिकांचा लोंढा कमी झाला. शहरी भागात कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने असल्याने एस.टी.तून प्रवास करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. ग्रामीण भागात बसफेऱ्या बंद झाल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत.
--------------------------
बार्शीटाकळी परिसरात सुविधांचा अभाव
बार्शीटाकळी : शहरालगत बाहेरगावाहून आलेल्या मजुरांच्या अनेक झोपड्या आहेत. मात्र, येथील नागरिक पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. अनेक वर्षांपासून येथे आवश्यक प्रमाणात सोयीसुविधा अद्यापही पोहोचल्या नाहीत.
---------------------
डुकरांच्या बंदोबस्ताकडे महापालिकेचे दुर्लक्ष
अकोला : गेल्या काही दिवसांपासून शहरातील सर्व वॉर्डांत डुकरांचा हैदोस प्रचंड वाढला आहे. मात्र, पालिकेच्या वतीने डुकरांच्या बंदोबस्ताकरिता काही महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आलेली मोहीम थंड बस्त्यात असल्याचे दिसून येते. पालिका प्रशासनाचे डुकरांच्या हैदोसाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.
-------------------
विनाविमा वाहनांवर कारवाईच नाही
अकोला : कोणतेही वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनाचा विमा काढणे बंधनकारक आहे. वाहनाचा विमा असल्यास अपघातानंतर आर्थिक मदत मिळण्यास वाव असतो. मात्र, वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून वाहन खरेदी सुरू असल्याने रस्त्यावर लाखो वाहने विम्याशिवाय धावत आहेत.
--------------------------
सुरक्षाकवचाविना डीपी धोकादायक
बाळापूर : तालुक्यातील अनेक ठिकाणी विद्युत कंपनीचे डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. विद्युतप्रवाहाचा पुरवठा या उघड्या डीपीमधून होत आहे. त्यामुळे त्यापासून केव्हाही मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, विद्युत कंपनीचे याकडे दुर्लक्ष होत आहे.