जनता भाजी बाजारात अस्वच्छता
अकोला: शहरातील जनता भाजी बाजारात अस्वच्छता पसरली आहे. भाजी विक्रेते सडका भाजीपाला रस्त्याच्या एका बाजूला टाकत असल्याने येथे कचऱ्याचा ढीग लागला आहे. भाजीपाला सडल्याने परिसरात अस्वच्छतेसोबतच मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, प्रशासनाने बाजाराची सफाई करावी अशी मागणी होत आहे.
कापड बाजार मार्गावर वाहतुकीची कोंडी
अकोला: खुले नाट्यगृहाकडून फतेह चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, अनेक जण रस्त्यावरच वाहने उभी करतात. परिणामी या मार्गावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होताना दिसून येते. रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्यांवर प्रशासनाने दंडात्मक कारवाई करुन मार्गावरील अतिक्रम हटविण्याची आवश्यकता आहे.
फुथपाथवर झुडपांचे साम्राज्य
अकोला: अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी मार्गावर फुथपाथची निर्मिती करण्यात आली आहे. या फुथपाथवर अनेक ठिकाणी झुडपांचे साम्राज्य झाले असून, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शिवाय, फुथपाथवर ठिकठिकाणी अतिक्रमण करण्यात आले असून, रुग्णवाहिकादेखील येथेच उभ्या करण्यात येतात. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरूनच चालावे लागते.