एनआरएचएम कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत
अकाेला : जिल्हा परिषदेच्या ‘एनआरएचएम’मध्ये कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन मागील वर्षभरापासून अनियमित आहे. वर्षभराच्या कालावधीत कर्मचाऱ्यांना अनेकदा महिन्याच्या शेवटी वेतन अदा केले जाते. अनियमित वेतनाच्या मुद्द्यावर या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
काटेपूर्णा अभयारण्याचा स्थापना दिवस
अकाेला: जिल्ह्यात वनपरिक्षेत्राचा समावेश असलेल्या काटेपूर्णा अभयारण्याचा स्थापना दिवस आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. अभयारण्यालगतच्या गावातील शालेय विद्यार्थ्यांना निसर्ग सहलीसाठी अभयारण्यात आणण्यात आले हाेते. यावेळी जंगलातील जैवविधतेचे महत्त्व सांगण्यात येऊन विद्यार्थ्यांना बाेटीची सैर घडवून आणली.
मनपाकडून अनुकंपाधारकांची उपेक्षा
अकाेला: मागील अनेक वर्षांपासून महापालिकेत नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या ७८ अनुकंपाधारक उमेदवारांची प्रशासनाकडून उपेक्षा केली जात आहे. शुक्रवारी पात्र लाभार्थ्यांनी मनपा आयुक्त निमा अराेरा यांच्याकडे धाव घेत, नियुक्त करण्याची मागणी केली. आज राेजी यातील १२ लाभार्थ्यांचे वय निघून गेल्यामुळे ते नियुक्तीसाठी अपात्र ठरले आहेत.
पशु आराेग्य शिबिर
अकाेला: स्नातकाेत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकाेला यांच्या काैशल्य विकास प्रशिक्षण केंद्राच्या वतीने दुग्ध व्यवसाय विषयावर उद्याेजकता विकास व पशू आराेग्य शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. शिबिरात समन्वयक डाॅ.प्रवीण बनकर, डाॅ.श्याम देशमुख, डाॅ.कुलदीप देशपांडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. पाळीव पशुंची काळजी घेण्यासाेबतच दुधाचे उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात आला.
‘एसए’महाविद्यालयात ग्रंथ प्रकाशन
अकाेला: सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात १४ फेब्रुवारी राेजी ग्रंथ प्रकाशनाचा कार्यक्रम आयाेजित करण्यात आला आहे. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या विकास समितीचे अध्यक्ष रूपचंद अग्रवाल हे राहणार आहेत. ग्रंथ चर्चेसाठी औरंगाबाद येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रा.डाॅ.संजय मून, डाॅ.वासुदेव मुलाटे, तथा लेखक, कवी व समीक्षक प्रा.डाॅ.भास्कर पाटील उपस्थित राहतील.
सुगम संगीत स्पर्धा
अकाेला : स्थानिक श्रीमती लराताे वाणिज्य महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी शहरातील १२ महाविद्यालयांतील एकूण २४ स्पर्धकांनी सहभाग नाेंदविला. उद्घाटन समारंभाला महाविद्यालयाचे प्राचार्य एस.जी.चापके अध्यक्षस्थानी हाेते. संगीत स्पर्धेच्या आयाेजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण हाेते.
हरिहरपेठमध्ये साचले पाणी
अकाेला : जुने शहरातील हरिहरपेठमध्ये मनपाच्या जलकुंभातून सातत्याने पाण्याचा विसर्ग हाेताे. पाण्याच्या आउटलेटमधून माेठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने, जलकुंभाचा परिसर जलमय झाला आहे. पाण्याचा अपव्यय थांबविण्यासाठी जलप्रदाय विभाग पुढाकार घेइल का, असा सवाल उपस्थित झाला आहे.
उड्डाणपुलाखाली सांडपाण्याची समस्या
अकाेला: शहरात खदान पाेलीस ठाणे ते रेल्वे स्टेशन राेडपर्यंतच्या निर्माणाधिन उड्डाणपुलाखाली रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. पावसाचे पाणी व रस्त्यालगतच्या दाेन्ही बाजूंच्या दुकानांमधील सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्यांचे बांधकाम केले जात आहे, परंतु नाल्यांचे बांधकाम नियमानुसार हाेत नसल्याचा आक्षेप व्यावसायिकांनी घेतला आहे.
जलवाहिनीसाठी खाेदला रस्ता
अकाेला : जलवाहिनीचे जाळे टाकण्यासाठी जुने शहरातील हरिहरपेठ रस्त्याच्या मधाेमध खाेदकाम करण्यात आले आहे. या मार्गावरील वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता, खाेदकाम केलेला रस्ता तातडीने बुजविण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. यापूर्वीही कंत्राटदाराने खाेदलेल्या रस्त्याची विलंबाने दुरुस्ती केली हाेती.