नासीर शेख
लोकमत न्यूज नेटवर्क
खेट्री : येथील अतिक्रमणधारकांनी ग्रामपंचायतीने नोटीस बजावूनही अतिक्रमण हटविले नसल्याने ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांकडे याविषयीची तक्रार दिली आहे. या तक्रारीची दखल घेत पालकमंत्र्यांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश १३ जानेवारी रोजी पत्राद्वारे गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.
पातूर तालुक्यातील खेट्री येथील बसस्थानकाजवळ झोपडपट्टीकडे जाणाऱ्या रस्त्यावर काहींनी अतिक्रमण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व ग्रामपंचायत यांना दिलेल्या निवेदनातून केला होता. ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेऊन ५ जानेवारी रोजी अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली होती; परंतु, यावर आठवडा उलटला तरी अतिक्रमण हटविण्यात आले नाही. अतिक्रमणधारकांनी नोटीसकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडे तक्रार केली. या प्रकरणात पालकमंत्र्यांनी तक्रारीची दखल घेऊन अतिक्रमण केल्याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश १३ जानेवारी रोजी पत्राद्वारे गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून येथे झोपडपट्टी वसली आहे. या भागात जाण्यासाठी गावातून एकमेव रस्ता आहे; परंतु, या रस्त्यावर काहींनी पंधरा फुटाचे अतिक्रमण केल्यामुळे रस्ता अरुंद झाल्याचा आरोप २९ डिसेंबर रोजी दिलेल्या निवेदनातून ग्रामस्थांनी केला होता. याबाबत अतिक्रमणधारकांना नोटीसही बजावण्यात आली; मात्र अद्यापही अतिक्रमण हटविण्यात आलेले नाही.