अकोला : अशोक वाटिका ते रेल्वेस्थानक या धुळवड झालेल्या वादग्रस्त मार्गाची दुरुस्ती डांबरीकरणाने रविवारी सुरू झाली. सीआर कन्स्ट्रक्शनचे कंत्राटदार प्रमोद चांडक यांच्याकडूनच हे डांबरीकरण करून घेण्यात येत असून, त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग जातीने लक्ष देत आहे.तीन दिवसांच्या संततधार पावसातच सव्वा कोटींचे सीलकोट डांबरीकरण वाहून गेल्याने अकोला सार्वजनिक बांधकाम विभागाची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली होती. या मार्गांवर ठिकठिकाणी खड्डे पडले, डांबरीकरणासाठी वापरलेली चुरी उघडी पडल्याने या मार्गावर धुळवड सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी लोकप्रतिनिधींना आणि राजकीय पक्षांना शिवाशाप देणे सुरू केले होते. प्रसारमाध्यमांनीदेखील शहरातील मार्गांच्या दुर्दशेवर सडकून टीका नोंदविली. दरम्यान भाजप, शिवसेना पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास धारेवर धरले. ठिय्या आंदोलन आणि घेराव घालून कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण यांना जाब विचारला. पंधरवड्यात या मार्गाचे डांबरीकरण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता रविवारी प्रत्यक्ष डांबरीकरणातून झाली. मात्र, या डांबरीकरणाचा दर्जा पाहण्याची जबाबदारीदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांनी स्वीकारावी, अशा मार्मिक प्रतिक्रिया अकोलेकरांकडून व्यक्त होत आहे.- अकोला रेल्वेस्थानक ते अशोक वाटिका मार्ग आठ दिवसांच्या आत चांगला केला जाईल. यापुढे या मार्गाची तक्रार राहणार नाही. डांबरीकरणाची गुणवत्ता मी जातीने तपासणार आहे.-मिथिलेश चव्हाण, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम, अकोला.