अकोला: वाहनधारकांनी वाहतुकीचे नियमांचे पालक करून अपघात टाळावेत, असे आवाहन पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी केले. गुरुवारी रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त वाहतूक सजगता मोहीमही राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.लोकसंख्येच्या तुलनेत वाहनांची संख्या वाढली आहे. शहरात साडेचार लाख ६६४ वाहनांची संख्या आहे; मात्र रस्ते अरुंद आणि लहान आहेत. पोलीस दलातर्फे शहरामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये सुरक्षित वाहतुकीबाबत नागरिकांमध्ये व विद्यार्थांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. हेल्मेट वापरणे, दारू पिऊन वाहन न चालवण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी केले. या सप्ताहामध्ये नाकाबंदी, पोलिसांकडून प्रबोधनपर पथनाट्य, वाहनांना रिफेल्क्टर लावणे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते त्या ठिकाणी वनवे करण्यात येणार असून, रोड डिव्हायडर बनवण्यात येणार आहे. यामध्ये महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग व प्रादेशिक परिवहन विभागालाही सहभागी करून घेतल्या जाणार असल्याचे कलासागर यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील, प्रक्षिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक डॉ. नीलेश देशमुख, वाहतूक शाखा प्रमुख तथा सिटी क ोतवालीचे ठाणेदार विलास पाटील उपस्थित होते.