अकोला: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू येथील रस्ता कामातील भ्रष्टाचार प्रकरणात कंत्राटी सहायक कार्यक्रम अधिकारी (एपीओ) ए.आर. जानोतकर यांची सेवा समाप्त करून, गटविकास अधिकार्यासह (बीडीओ) सात जणांकडून ४ लाख ६९ हजार ४४७ रुपये वसूल करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी १0 फेब्रुवारी रोजी दिला.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बोरगावमंजू ते जुना शेतरस्ता या रस्त्याचे काम करण्यात आले. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार बोरगावमंजू येथील रवींद्र ढवळे यांनी केली होती. त्यानुषंगाने या रस्ता कामाची चौकशी आकोटचे उ पविभागीय अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आकोट उपविभागीय अधिकार्यांकडून करण्यात आली. त्यांच्याकडून जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात आलेल्या चौकशी अहवालाच्या आधारे अकोला पंचायत समितीचे तत्कालीन सहायक कार्यक्रम अधिकारी व सध्या बाश्रीटाकळी पंचायत समितीचे सहायक कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत ए.आर. जानोतकर यांनी सादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्याने, तो अमान्य करण्यात आला. कामात कसूर आणि अक्षम्य हलगर्जी केल्याने, कंत्राटी तत्त्वावरील सहायक कार्यक्रम अधिकारी ए.आर. जानोतकर यांची सेवा समाप्त करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी १0 फेब्रुवारी रोजी दिला. तसेच रस्ता कामातील अनियमितता प्रकरणात अकोला पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांसह त त्कालीन शाखा अभियंता, सहायक कार्यक्रम अधिकारी, पालक तांत्रिक अधिकारी, ग्राम रोजगारसेवक, ग्रामसेवक व सरंपच इत्यादी सात जणांकडून ४ लाख ६९ हजार ४४७ रुपये वसूल करण्याचा आदेश जिल्हाधिकार्यांनी दिला.
रस्ता कामात भ्रष्टाचार; ‘एपीओ’ सेवेतून बाद
By admin | Published: February 19, 2016 2:11 AM