संतोष येलकर / अकोलाजिल्हा परिषद सेस फंडातून ५२ सर्कलमध्ये पाच कोटींच्या रस्ते कामांचे नियोजन जिल्हा परिषदमार्फत करण्यात आले असले तरी, या कामांची अंदाजपत्रके आणि प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया अद्याप रखडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाच कोटी रस्त्यांची जिल्हा परिषदेत अडकलेली कामे यावर्षी मार्गी लागणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सेस फंडाच्या निधीतून यावर्षी जिल्हा परिषदेच्या ५२ सर्कलमध्ये ग्रामीण भागात पाच कोटींच्या अंतर्गत रस्ते कामांचे नियोजन जिल्हा परिषद बांधकाम समितीमार्फत करण्यात आले आहे. सर्कलनिहाय रस्ते कामांसाठी सदस्यांना निधीचे वाटपदेखील निश्चित करण्यात आले आहे. परंतु, ह्यमार्च एन्डिंगह्णला केवळ एक महिना दहा दिवसांचा कालावधी उरला असताना, जिल्हय़ातील ग्रामीण भागातील रस्ते कामांची अंदाजपत्रके जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या उपविभागाकडून अद्याप तयार होणे बाकी आहेत. तसेच अंदाजपत्रके तयार करण्यात आली नसल्याने, रस्ते कामांना प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रियादेखील रखडली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कारभारात अडकलेल्या ग्रामीण भागातील रस्ते कामांचे कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) येत्या मार्च अखेरपर्यंत दिले जाणार की नाही, आणि रस्त्यांची कामे मार्गी लागणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्हा परिषदेत अडकली रस्त्यांची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2016 2:36 AM