महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे ३० सप्टेंबर राेजी सकाळी साडेअकरा वाजता ऑनलाईन प्रणालीद्वारे आयाेजन करण्यात आले आहे. सभेमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी खरेदी केल्या जाणाऱ्या वाहनांच्या संदर्भात चर्चा करुन निर्णय घेतला जाणार आहे. ‘स्वच्छ भारत’अभियान अंतर्गत १४ व्या वित्त आयाेगाच्या निधीतून बांधकाम करण्यात आलेली व आज राेजी निर्माणाधीकन सार्वजनिक शाैचालयांचे देयकांसाठी मंजुरी देण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. महापालिका क्षेत्रातील वृक्षांची जनगणना करण्याबाबतही प्रशासनाने प्रस्ताव सादर केला आहे.
खंडवा ब्राॅड गेजसाठी मनपाची जागा
दक्षिण मध्य रेल्वेच्या अकाेला ते पूर्णा मीटर गेजचे आता ब्राॅड ग्रेजमध्ये परिवर्तन केल्यानंतर अकाेला ते खंडवा ब्राॅड गेज मार्ग अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, खंडवा ब्राॅड गेजच्या कामासाठी दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाला मनपाच्या जागेची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने माैजे नायगाव सर्व्हे क्रमांक १२ मधील ३.२९ हेक्टर आर जागेतून ०.३६ हेक्टर आर जागेच्या खरेदीचा प्रस्ताव मनपाकडे प्राप्त झाला आहे. जागेचे मूल्य २ काेटी ८१ लाख ७० हजार रुपये हाेत आहे. यावर निर्णय घेण्यात येईल.
मणकर्णा, शेलारफैलच्या प्रस्तावाला स्थगिती?
मणकर्णा प्लाॅट, शेलारफैलमध्ये मनपाच्या जागेवर अत्यल्प भाडेपट्ट्याने राहणाऱ्या नागरिकांना भाडेपट्ट्यात वाढ करण्याच्या अनुषंगाने तत्कालीन आयुक्त निमा अराेरा यांनी येत्या १३ ऑक्टाेबर राेजी ई-लिलाव प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला हाेता. प्रशासनाच्या प्रस्तावाला स्थगिती देण्याबाबत सभेत चर्चा केली जाणार आहे.