लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जलवाहिनीचे जाळे टाकण्याच्या सबबीखाली महापालिकेने नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने ऐन पावसाळ््यात रस्त्यांचे खोदकाम केले. संपूर्ण शहरातील रस्त्यांची दुरवस्था केल्याचे चित्र असून, रस्ते दुरुस्तीला कंत्राटदाराने ठेंगा दाखवल्याचे समोर आले आहे. कंत्राटदाराच्या मनमानीवर मनपा प्रशासनाचे कवडीचेही नियंत्रण नसून, पावसाळ््यात अकोलेकरांना भोगाव्या लागत असलेल्या नरकयातनांकडे सत्ताधारी भाजपाने सोयीस्कर कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे.केंद्र व राज्य शासनाच्या अमृत अभियान अंतर्गत संपूर्ण शहरातील जलवाहिनीचे जाळे बदलून नवीन टाकणे, महान धरण ते अकोला शहरापर्यंत मुख्य जलवाहिनीचे जाळे बदलणे या व्यतिरिक्त शहरात विविध ठिकाणी नवीन ८ जलकुंभ उभारण्याच्या कामासाठी मनपा प्रशासनाने ‘एपी अॅण्ड जीपी’ नामक कंपनीची नियुक्ती केली. कंपनीच्या मनमानी कारभारावर मनपाचे कवडीचेही नियंत्रण नसल्यामुळे भर पावसाळ्यात मुख्य रस्त्यांचे खोदकाम केल्या जात आहे. जलवाहिनी टाकल्यानंतर रस्त्याची तातडीने दुरुस्ती होणे भाग असताना कंपनीकडून दुरुस्तीला ठेंगा दाखविल्या जात असल्याने नादुरुस्त रस्त्यातून वाट काढताना अकोलेकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऐन पावसाळ््यात रस्ते खोदून ठेवल्यानंतर त्यांची दुरुस्ती का नाही, असा जाब विचारण्याची जबाबदारी अकोलेकरांनी सत्ताधारी भाजपासह सर्वपक्षीय नगरसेवकांवर सोपवली असताना सर्वांनी चुप्पी साधणे पसंत केल्याचे दुर्दैवी चित्र आहे.गीता नगरमध्ये जीवघेणा खड्डाजलवाहिनीचा व्हॉल्व्ह बसविण्यासाठी ‘एपी अॅन्ड जीपी’ कंपनीने गीता नगरमध्ये मुख्य रस्त्यालगत भला मोठा खड्डा खोदला. मागील महिनाभरापासून व्हॉल्व्ह दुरुस्तीच्या नावाखाली हा खड्डा जैसे थे आहे. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले असून, माती रस्त्यावर पसरली आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहने घसरून अपघाताची शक्यता बळावली आहे. यावरून भाजप नगरसेवकांच्या कामाचे मूल्यमापन केले जात आहे.
पावसाळ््यापूर्वी रस्ते दुरुस्ती नाहीच!टिळक रोडवरील त्रिवेणेश्वर कॉम्प्लेक्ससमोरील सिमेंट रस्ता, छत्रपती शिवाजी पार्क रस्ता, अग्रसेन चौक, टॉवर चौक, रेल्वे स्टेशन रस्ता, पंचायत समितीसमोरील रस्ता, वाशिम बायपास ते हरिहरपेठ, महाराणा प्रताप बाग ते खोलेश्वरपर्यंतच्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. पावसाळ््यापूर्वी रस्ते दुरुस्ती शक्य असताना याकडे प्रशासनासह सत्ताधारी भाजपाने दुर्लक्ष का केले, असा सवाल अकोलेकरांनी उपस्थित केला आहे.या रस्त्यावरून जाताय..., सावधान!उड्डाणपुलाची निर्मिती व्हावी, यासाठी भाजप लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा केला. २६७ कोटींच्या निधीतून खदान पोलीस ठाणे ते थेट अग्रसेन चौकापर्यंत उड्डाणपुलाचे निर्माण कार्य सुरू असले तरी मुख्य रस्त्याची अक्षरश: चाळण झाल्याचे चित्र आहे. पुलाखाली दोन्ही बाजूंनी ‘साइड रोड’चे अर्धवट काम केल्यानंतर संबंधित कंपनीने हात वर केले. या मार्गावर खड्ड्यांमुळे ट्रकखाली चिरडून अनेकांचे बळी गेले आहेत. तेव्हा अकोलेकरांनो, या मार्गावरून जाताना जरा सावधान, असे म्हणायची वेळ आली आहे.
जलवाहिनीचे जाळे टाकणाऱ्या कंपनीसोबत करार झाला असून, यामध्ये रस्ते दुरुस्तीचा समावेश आहे. कंपनी ही जबाबदारी झटकू शकत नाही. अन्यथा कारवाईचा पर्याय खुला आहे.- संजय कापडणीस,आयुक्त, मनपा