कंत्राटदाराने गावातील जेसीबीद्वारे काँक्रिटचे रस्ते फोडून पाइपलाइन टाकली. त्यामुळे गावातील रस्त्यांवर मातीचे ढीग व खड्डे झाले आहेत. खड्डे बुजवण्यात न आल्यामुळे पहिल्याच पावसात गावात चिखल साचला आहे. चिखल व खड्ड्यांमुळे रस्त्यांवरून जाताना, कसरत करावी लागत आहे. वाहनांचे अपघात घडत आहेत. गावातील युनियन बँक ऑफ इंडिया शाखेसमोर रस्त्यावर दोन्ही बाजूने खोदून ठेवलेल्या खड्ड्यांमुळे निराधार, दिव्यांग, वयोवृद्ध नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे गावातील रस्ते खड्ड्यांत गेले आहेत. पावसामुळे संपूर्ण गावात चिखल साचला आहे. कंत्राटदाराने पावसाळ्यापूर्वीच हे खड्डे बुजवायला हवे होते. मात्र, कंत्राटदाराच्या बेजबाबदार कामामुळे गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. राजकीय पुढाऱ्यांचा आशीर्वाद असल्यामुळे कंत्राटदार निर्ढावला आहे.
फोटो :
पेयजल योजनेतून अर्धवट काम!
कुरणखेड येथे राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला २ कोटी २४ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून या निधीमधून दोन विहिरी, एक पाण्याची टाकी, जुनी वस्ती, नवीन वस्ती, खर्डा भागातील संपूर्ण पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. परंतु काम अर्धवट स्थितीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. राष्ट्रीय पेयजल योजनेंंतर्गत सुरू असलेल्या कामाचे कोणतेही फलक अथवा कामाचे स्वरूप याचे फलकसुद्धा कुठे दिसत नसल्यामुळे कामामध्ये कुठेतरी पाणी मुरत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.
कुरणखेड येथील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामात घोळ झाल्याचे दिसून येत आहे. काम संथगतीने चालू आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
-विकास मोहोड, सामाजिक कार्यकर्ते कुरणखेड