मूर्तिजापूर : शहरात संचारबंदी व जमावबंदी लागू असतानाही नागरिक विनाकारण रस्त्यांवर फिरताना आढळून येत होते. किराणा, औषधी व भाजीपाला दुकानात शुक्रवारी ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्याचबरोबर लसीकरणासाठी अभ्यासिका केंद्रातही नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सर्वत्र १४४ कलमांतर्गत जमावबंदी व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असे असतानाही त्याला न जुमानता नागरिक विनाकारण रस्त्यावर बिनधास्त फिरत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, शहरातील जीवनावश्यक वस्तूची प्रतिष्ठाने सकाळी ७ ते ११ या वेळेत चालू ठेवण्यात आल्याने याचा फायदा घेत नागरिक रस्त्यांवर गर्दी करीत आहेत. शहरातील हॉटेल्स, पानठेले, स्टेशनरी, हार्डवेअर, कापड दुकान, दारू दुकानासह शहरातील सर्वच प्रतिष्ठाने, बाजारपेठ बंद ठेवण्यात आली असली तरी भाजीपाला, किराणा दुकान, औषधी दुकानात लोकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. तसेच अभ्यासिका केंद्रात लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी दिसून आली. आरोग्य प्रशासनाच्या हलगर्जीमुळे व्यवस्थापनाअभावी गैरसोय झाली. गत आठ दिवसांपासून लसींचा साठा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांच्या चकरा सुरूच आहेत. शुक्रवारी फक्त २४० लस पोहोचल्याने न. पा. स्पर्धा अभ्यासिका केंद्रात लस घेणाऱ्यांची तुंबड गर्दी झाली होती.
-------------
वैक्सिनचा तुटवडा असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक दिवसांपासून उपजिल्हा रुग्णालयात व विविध ठिकाणच्या बूथवर लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. प्रशासनाने लस उपलब्ध करून देऊन नागरिकांची गैरसोय टाळावी.
-सुनील लशुवाणी, रुग्ण कल्याण समिती सदस्य, नगरसेवक, मूर्तिजापूर