अकोटः सातपुडा पायथ्याशी असलेल्या सात गावात कोरोनाची धास्ती पसरली असून, गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी गावांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. गावात कडक निर्बंधांचे पालन होत असल्याने गावातील रस्ते निर्मनुष्य दिसत असून, गावात केवळ पोलिसांची छावणी मुख्य रस्त्यावर दिसत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहराऐवजी ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग जास्त प्रमाणात वाढला. ग्रामीण भागात प्राथमिक तपासणीमध्ये कोरोनाचे हायरिक्स रुग्ण निघाले आहेत. विशेष म्हणजे तालुक्यातील अकोलखेड, अकोली जहागीर, सुकळी, रुईखेड, बोर्डी, दिवठाणा, लोहारी या गावात रुग्ण संख्या लक्षात घेता या गावांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले. सध्या या गावाचे सर्व रस्ते बंद करण्यात आले असून, या संदर्भात ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी बिट जमादार, पोलीस कर्मचाऱ्यांसोबत संबंधित गावांना भेटी देऊन गावाचे रस्ते सील केले आहेत. त्यामुळे गावात बाहेरगावाच्या नागरिकांचे जाणे-येणे बंद करण्यात आले आहे. गावात कडक निर्बंधांचे पालन होत असून, अंतर्गत रस्ते, मंदिरांमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे.
मुख्य रस्त्यावर वाहनांची तपासणी सुरू
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण अकोट तालुक्यातील अकोलखेड, अकोली जहागीर, सुकळी, रुईखेड, बोर्डी, दिवठाणा, लोहारी येथे लॉकडाऊन यशस्वी होत आहे. या गावांमध्ये दि. १६ मेपासून ग्रामपंचायत पथक, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक गावात पूर्णवेळ कोरोना प्रतिबंध कार्यवाही लक्ष देण्याचे सूचना देण्यात आले आहेत. मुख्य रस्त्यावर वाहनांची तपासणी व कारवाई सुरू आहेत. या गावातील कोरोना चाचणी व लसीकरणासाठी प्रशासनाने लक्ष घातले आहे.
---------------------
बी-बियाणे खते पोहोचणार बांधावर!
ग्रामीण भागात सध्या मशागतीच्या कामाला वेग आला आहे. शेतातील खरीप हंगामपूर्वी मशागतीचे कामे अंतिम टप्प्यावर असून, खत, बी-बियाणे खरेदीवर भर वाढला आहे. त्यामुळे तहसीलदार नीलेश मडके यांनी शेतकऱ्यांना घरपोच व बांधावर पंचायत समिती व कृषी विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.