लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गोरक्षण रोडवरील माधवनगरमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा दरोडेखोरांना खदान पोलिसांनी मंगळवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास रंगेहात अटक केली. हे दरोडेखोर पोलिसांना पाहून अंधारात लपल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली असून, त्यांच्याकडून चाकू, दोरी, मिरची पूड, तलवार व दरोडा टाकण्यात वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले. खदानचे ठाणेदार संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शशिकांत नावकर व त्यांचे सहकारी मंगळवारी रात्री गस्तीवर असताना माधवनगरमध्ये अंधाराचा आडोसा घेऊन काही संशयित त्यांना लपताना दिसून आले. पोलिसांनी त्यांचे वाहन थांबवून या सहा संशयितांचा पाठलाग केला व त्यांना ताब्यात घेतले. यामध्ये महेश एकनाथ करोडदे, ज्ञानेश्वर विजय करोडदे, (अंबाशी, पातूर) व शुभम पंढरी मुंडे, वासुदेव ज्ञानेश्वर पुंडे, अविनाश मेघश्याम मल्लेवार, (सर्व रा. बालाघाट मध्य प्रदेश) या सहा जणांचा समावेश आहे, तर मलकापूर परिसरातील रहिवासी असलेला संजय अशोक जायले हा पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी पकडलेल्या संशयितांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याजवळ दोरी, मिरची पूड, स्क्रू ड्रायव्हर, टॉमी असे घर फोडण्याचे साहित्य जप्त केले. घटनास्थळाच्या बाजूलाच टाटा इंडिका विस्टा ही गाडी उभी होती. या संदर्भात पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता, या आरोपींमधीलच महेश करोडदे याने वाहन त्याच्या मालकीचे असल्याचे सांगितले. यावरून कारची तपासणी केली असता, या कारमध्ये तलवार, लोखंडी पाइप, टॉमी आढळली. हे सहा जण शहरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. खदानचे ठाणेदार संतोष महल्ले व त्यांच्या पथकाने रात्र गस्तीत केलेल्या या कारवाईमुळे मोठी अनुचित घटना टळल्याचे दिसून आले. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली असून, फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे. ठाणेदार संतोष महाले यांच्या मार्गदर्शनात पोलीस तपास करीत आहेत. या आरोपींनी यापूर्वी कुठे-कुठे दरोडे टाकले, याविषयीची माहिती पोलीस कोठडीदरम्यान समोर येण्याची शक्यता आहे.
दरोडेखोरांची मोठी टोळी जेरबंद; खदान पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 2:36 AM
गोरक्षण रोडवरील माधवनगरमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा दरोडेखोरांना खदान पोलिसांनी मंगळवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास रंगेहात अटक केली.
ठळक मुद्देदरोडा टाकण्याच्या तयारीत असताना अटक