खेट्री : पातूर तालुक्यातील सस्ती वीज उपकेंद्रांतर्गत २७ गावे असून, प्रत्येक गावातील रोहित्राच्या उघड्या पेट्यांमुळे मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक रोहित्राला संरक्षण कुंपण नसल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी शिरपूर व पिंपळखुटा येथे रोहित्रांना आग लागल्याची घटना घडली होती. ग्रामस्थांच्या प्रयत्नामुळे मोठा अनर्थ टळला ; मात्र याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. गावानजीक सिंगल फेजचे रोहित्र असल्याने लहान मुले रोहित्राजवळ खेळतात. रोहित्राच्या उघड्या पेट्या असल्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सस्ती वीज उपकेंद्राचे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने ग्रामस्थ वैतागले आहेत. शॉक लागून पशुपालकांचे जनावरे दगावल्याच्या घटना घडल्या आहे. याबाबत थातूरमातूर चौकशी करून पशुपालकांना आर्थिक मदतीपासून वंचित ठेवले जात असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. याकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन रोहित्राची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.