लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला महानगर व जिल्हा काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या दोन दिवसांपासून स्वराज्य भवन येथे बैठकांचे सत्र सुरू आहे. मंगळवारी महानगर अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्याबाबतचा ठराव पदाधिकार्यांनी घेतला होता. बुधवारी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदासाठी झालेल्या बैठकीत मात्र केवळ निवडणुकीचा ठराव घेण्याऐवजी सामंजस्याची भूमिका समोर आली आहे. जिल्हाध्यक्ष पदाची निवड ही निवडणुकीने घ्यावी, पक्षo्रेष्ठींनी थेट निवड करून अध्यक्ष द्यावा, असे पर्याय बैठकीत समोर ठेवण्यात आले, तर काही पदाधिकार्यांनी ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याबाबतही भूमिका मांडली.स्थानिक स्वराज्य भवन येथे बुधवारी सकाळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आमदार राजेशकुमार यांनी पदाधिकार्यांची मते जाणून घेतली. यावेळी जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, प्रदेश महासचिव मदन भरगड, माजी मंत्री डॉ. अजहर हुसेन, नातिकोद्दिन खतीब, महानगराध्यक्ष बबनराव चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष बाबाराव विखे पाटील, महासचिव राजेश भारती, महासचिव प्रकाश तायडे, रमाकांत खेतान, माजी मंत्री रामदास बोडखे, स्वाती देशमुख, मूर्तिजापूर माजी तालुकाध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर ढेरे, अन्वर खान, कपिल रावदेव, आकाश कवडे, हेमंत देशमुख आदी उपस्थित होते.
अहवाल देणार काँग्रेसचे जिल्हा महासचिव प्रकाश तायडे हे जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत. त्यांच्या सर्मथनार्थ अनेक पदाधिकार्यांनी आपले मत निवडणूक अधिकारी आ. राजेशकुमार यांच्याकडे व्यक्त केले, तर हिदायत पटेल यांनीही जिल्हा काँग्रेस उत्तम सांभाळली असून, त्यांना पुन्हा संधी मिळाली तरी हरकत नाही, असेही पटेल यांच्या सर्मथकांनी निवडणूक निरीक्षकांसमोर सांगितले. बैठकीत व्यक्त झालेल्या भूमिकांबाबत आ. राजेशकुमार हे पक्षo्रेष्ठींकडे अहवाल देणार असून, या बैठकीचे झालेले चित्रीकरणही वरिष्ठांपर्यंत पोहचविले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गटबाजी टाळण्याचे आवाहन बिहारचे आमदार राजेशकुमार यांनी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्षातील गटबाजी टाळण्याचे आवाहन केले. भाजपाने राष्ट्रपतीच्या निवडणुकीलाही जातीय रंग देत राजकारणाचा स्तर गमावला असल्याचा आरोप करीत, आ. राजेशकुमार यांनी काँग्रेस पदाधिकार्यांना सक्रिय होत लोकांचे प्रश्न लावून धरण्याचे आवाहन केले. काँग्रेस ही विचारधार आहे. या पक्षामध्ये कुणावरही अन्याय होणार नाही. खर्या कार्यकर्त्याला न्याय मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यकर्ते कुणाचे? जिल्हा निवडणूक अधिकारी आ. राजेशकुमार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी गटा-गटाने बंदद्वार चर्चा केली. यावेळी काही नेत्यांसोबत आलेले कार्यकर्ते हे खरे कार्यकर्ते नाहीत, असा आक्षेप काहींनी घेतल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, सामंजस्याची भूमिका कायम ठेवत वाद निवळण्यात आला. -