खेट्री : पातूर तालुक्यातील चतारी येथे सरपंचपदासाठी रस्सीखेच सुरू असून, राजकीय वातावरण तापले आहे. ग्रामपंचायतच्या निवडणुकीपूर्वी काढलेल्या आरक्षणात चतारी सरपंचपदासाठी एसटी प्रवर्गाचे आरक्षण काढण्यात आले हाेते. एसटी प्रवर्गातील उमेदवार नसल्याने सरपंचपदाचा पदभार उपसरपंच सोनू मंगेश लखाडे यांच्याकडे होता. आता अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला सरपंच हाेणार आहे.
चतारी येथे शिवसेना आणि भाजप, वंचितप्रणीत, अशा दाेन पॅनलने आपापले ९ उमेदवार रिंगणात उतरविले होते. शिवसेना पॅनलचे ९ पैकी ७ सदस्य भरघोस मतांनी निवडून आले. भाजप, वंचित पॅनलचे फक्त दोनच सदस्य निवडून आले. शिवसेना पॅनलचाच सरपंच होईल, असा विश्वास शिवसेनेचे कार्यकर्ते व गावकऱ्यांना होता; परंतु शिवसेनेच्या पॅनलवर निवडून आलेल्या तीन सदस्यांनी बंडखोरी करून भाजप, वंचितसोबत युती केली आणि ग्रामपंचायतवर भाजप, वंचितप्रणीत पॅनलचा झेंडा फडकला. एसटी आरक्षणाचा उमेदवार नसल्याने उपसरपंच सोनू मंगेश लखाडे यांच्याकडे सरपंचपदाचा पदभार होता; परंतु पातूर तालुक्यातील पाच ग्रामपंचायत सरपंचपदांचे आरक्षण घोषित होण्याआधीच भाजप, वंचितच्या एका सदस्याने बंडखोरी केली होती. त्यामुळे शिवसेनेकडे सत्ता स्थापन करण्यासाठी पाच सदस्यांचे पूर्ण बहुमत झाले होते; परंतु १६ मार्च रोजी निघालेल्या आरक्षण सोडतमध्ये सरपंचपदासाठी अनुसूचित जाती स्त्री आरक्षण जाहीर झाले; परंतु शिवसेनेकडे पूर्ण बहुमत असताना, अनुसूचित जाती स्त्री उमेदवार नसल्याचे समोर आले असून, भाजप, वंचितप्रणीत पॅनलकडे बहुमत नसताना चार उमेदवारांमध्ये एक उमेदवार अनुसूचित जाती स्त्री आहे. दोन्ही गटांतील निवडून आलेल्या ९ उमेदवारांमध्ये अनुसूचित जाती स्त्री उमेदवार एकच असल्याने आणि तो उमेदवार भाजप, वंचितप्रणीत पॅनलकडे आहे. त्यामुळे भाजप, वंचितप्रणीत पॅनलचा सरपंच होऊन ग्रामपंचायतवर भाजप, वंचितप्रणीत पॅनलचा झेंडा फडकणार असल्याची गावात चर्चा आहे.