अतिवृष्टीमुळे नुकसान; मदतीची मागणी
अकोला : अतिवृष्टीमुळे हजारो कुटुंब बेघर झाली असून, शेकडो व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये पाणी घुसले आहे. हजारो हेक्टर जमीनही पाण्याखाली गेली. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने या नागरिकांच्या घरांची, शेतजमिनीची व मालाची पाहणी करून मदत द्यावी, अशी मागणी भाजप नेते डॉ.अशोक ओळंबे, गोपाल नागपुरे, हाजी चांदखा, संजय चौधरी, गजानन गोलाईत, रवि देशमाने, राजू चव्हाण, निखिल नाळे, प्रकाश नानकदे, शेरू अंधारे यांनी एका निवेदनाद्वारे केली.
अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी
अकोला : मुसळधार पावसाने तालुक्यातील निमकर्दा खंडाळा गावातील शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली आल्याने शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. बाळापूर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे नेते गजाननराव दांदळे यांनी पाहणी केली व प्रशासनाकडे मदतीची मागणी करणार असल्याचे सांगितले.
उपोषणस्थळी तहसीलदारांची भेट
अकोला : चिखलगाव येथील तलाठी यांनी गट क्रमांक ११ ची नोंद करताना न्यायालयाची वारस प्रमाणपत्र नसताना व मृत्यू प्रमाणपत्र नसताना नोंद केली. त्यामुळे क्षीरसागर मधुकर वानखेडे हे १९ जुलैपासून उपोषणाला बसले होते. सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांच्या विनंतीवरून तहसीलदार बळवंत अरखराव यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वानखडे यांच्या उपोषणस्थळी भेट दिली व त्यांना योग्य न्याय देऊ, असे आश्वासन दिले व उपोषण मागे घेतले.
ॲड.काकड यांनी दिला माणुसकीचा परिचय
अकोला : भाजप पूर्व मंडळ अध्यक्ष ॲड.देवाशिष काकड व पूर्व मंडळ सरचिटणीस अभिजीत कडू यांना रतनलाल प्लॉट चौक येथे एक महागडा मोबाइल सापडला. त्यांनी मोबाइल सिव्हिल लाइन पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलिसांना सुपुर्द केला. यावेळी पोलीस निरीक्षक भानुप्रताप मडावी यांच्या नेतृत्वात पो.काँ.यादव, पो.काँ. महेश सावंत, पो.काँ. शिरसाठ, पो.काँ.महाजन यांनी तपास करत, मोबाइल बार्शीटाकळी येथील कृषी अधिकारी विलास वाशिमकर यांचा असल्याचे निष्पन्न झाले. ठाण्यात बोलावून कागदपत्रांची शहानिशा करून मोबाइल त्यांना सुपुर्द करण्यात आला.