अकोला : कोरोनाच्या संकटामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्बंध लावले आहेत. यामध्ये भाजीपाला व फळांची विक्री बंद ठेवण्यात आली आहे. यासोबत भाजीबाजार बंद आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतातच सडत असून, लाखो रुपयांचा फटका बसत आहे.
जिल्ह्यामध्ये आधीच आठवडी बाजार बंद असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला; परंतु कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यात आणखी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे भाजीबाजार बंद आहे. रस्त्यावर भाजीपाला विक्रीसुद्धा ठप्प आहे. भाजीपाला विकावा तरी कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. परिणामी, भाजीपाला शेतात सडत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले आहे. जिल्ह्यात हजारो क्विंटल भाजीपाला शेतात पडून आहे.
--बॉक्स--
या जिल्ह्यातूनही येतो भाजीपाला
शहरातील भाजीबाजारात अकोला जिल्ह्यासह बुलडाणा, वाशिम, अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी येतो, तसेच याच जिल्ह्यांमधील व्यापारी भाजीपाला खरेदीसाठी येतात. बाजार बंद असल्याचे अर्थचक्र ठप्प झाले आहे.
--बॉक्स--
माल घ्यायला कोणी तयार नाही!
भाजी बाजार बंद असल्याने उत्पादित केलेला माल घ्यायला व्यापारी उत्सुक नाहीत. खरेदी केला तर तो विकायचा कुठे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. या सगळ्याचा फटका मात्र सर्वसामान्य शेतकऱ्याला बसत आहे. बहुतांश शेतकऱ्यांवर भाजीपाला शेतातच फेकून देण्याची वेळ आली आहे.
--बॉक्स--
भाजीपाला शेतातच पडून
शेतकऱ्यांचा भाजीपाला मोठ्या प्रमाणावर शेतातच पडून आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या मालाचा तोडाच केलेला नाही किंवा माल काढलेला नाही. कोणी खरेदी करायला तयार नसल्याने बहुतांश भाजीपाला शेतात सडत आहे.
--बॉक्स--
दररोज १००-१२० क्विंटल होती आवक
आठवडी बाजार बंद असल्याने भाजी बाजारात भाजीपाल्याची उलाढाल निम्म्यावर आली आहे. दररोज केवळ १००-१२० क्विंटल आवक होत होती; मात्र भाजीबाजार बंद असल्याने ही सर्व आवक बंद आहे.
--कोट--
निर्बंधांमुळे भाजीबाजार बंद आहे. भाजीपाला विक्री करावा तरी कसा, असा प्रश्न पडला आहे. सर्व भाजीपाला शेतात खराब होत आहे. मोठ्या आशेने ४ एकर कोबी, २ एकर टोमॅटो लावले होते. लवकरच भाजीपाला विक्री न झाल्यास फेकून देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
- दामोदर बर्डे, भाजीपाला उत्पादक शेतकरी, देऊळगाव
--कोट--
शेतात भेंडी, काकडीची लागवड केली होती. दर चांगले मिळेल अशी आशा होती; परंतु निर्बंधांमुळे भाजीपाला विक्री बंद आहे. परिणामी, भेंडीचे पीक तोडून फेकावे लागले. काही गावांत मोफत वाटप करून टाकले.
- देवीदास धोत्रे, भाजीपाला उत्पादक शेतकरी
--कोट--
भाजीबाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीची अडचण येत आहे. जिल्ह्यात बुलडाणा, वाशिम, अमरावती येथून माल येत होता. आता तो बंद आहे.
- अनंता चिंचोळकर, भाजीपाला व्यापारी.