- संतोष गव्हाळे लोकमत न्यूज नेटवर्कहातरुण : परतीच्या पावसाने पिकांची नासाडी केली. शेतात पिकापेक्षा गवत वाढले. पाने व फुले गळतीने कपाशीच्या शेतात फक्त झाडेच उभी होती. लावलेला खर्चही वसूल होत नसल्याची शक्यता वाढल्याने हातरूण येथील मुरलीधर पाटील यांनी पाच एकर शेतातील कपाशी पिकावर रोटाव्हेटर फिरवला.खारपाणपट्ट्यातील शेतशिवारात कपाशीचे पीक शेतकऱ्यांना चार पैसे हाती देईल, अशा उत्तम स्थितीत असताना परतीच्या पावसाने पिकांची स्थिती विदारक झाली. शेतकरी मुरलीधर पाटील यांचे अंदुरा भाग दोन शिवारात मोर्णा नदी काठालगत गट नंबर २१६ मध्ये ५.५ एकर शेती आहे. सन २०१६ मध्ये बँकेचे एक लाख ८५ हजार कर्ज काढले होते. नंतर कर्जाचे पुनर्गठन केले. २०१६ चे पुनर्गठन असूनसुद्धा कर्जमाफी मिळाली नाही. कर्जासाठी बँकेच्या चकरा मारल्या; मात्र निराशा झाली. सावकाराकडून खरीप हंगामातील पेरणीसाठी कर्ज काढले. त्यानंतर संपूर्ण शेतीसाठी १५ हजार रुपयांचे बियाणे घेतले. पेरणीचा खर्च १० हजार रुपये झाला. मशागतीसाठी शेतीला १० हजार लागले. निंदण मजुरी ३० हजार असा एकूण ६५ हजार रुपये खर्च लागला. सतत तीन महिने पाऊस सुरू राहल्याने शेतात पिकापेक्षा गवत वाढले. शेतात जाण्यासाठी एकमेव असलेल्या रस्त्यावर चिखल असल्याने शेतीची मशागत करता आली नाही. हिरवे स्वप्न साकार होईल, असे वाटत असताना दिवाळीपूर्वी परतीच्या पावसाने कहर केला. त्यामुळे कपाशीच्या पाने व फुलांची मोठ्या प्रमाणात गळती झाली. बोंड्यातून बाहेर आालेला कापूस वेचणी न झाल्याने भिजला असून, कापसाचा सडा शेतशिवारात पडला आहे. कपाशीची बोंडे सडली. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. पिकासाठी लावलेला खर्चही वसूल होणार नसल्याने निराश होऊन संपूर्ण ५.५ एकरातील कपाशी पिकावर रोटाव्हेटर फिरवला आहे. दिवाळी सणाला दिवा लावण्यासाठी व पूजेसाठी नवा कापूस घरी नव्हता, अशी भीषण ओल्या दुष्काळाची परिस्थिती ग्रामीण भागात आहे.पिकावर रोटाव्हेटर मारल्यानंतर रब्बी हंगामासाठी पैसा नाही. वर्षभर घरखर्च कसा चालवायचा, असा प्रश्न आहे.सावकाराचे कर्ज डोक्यावर आहे. शासनाच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. नुकसानाचे पंचनामे अजून झाले नाहीत. मदत पदरात कधी पडेल, या प्रश्नांसह भविष्याची चिंता शेतकरी मुरलीधर पाटील यांनी व्यक्त केली.
तीन शेतकऱ्यांनी कपाशी मोडली!यावर्षीच्या खरीप हंगामात सतत पाऊस सुरू राहिल्याने शेती मशागतीची कामे करता आली नाही. कपाशी पीक सततच्या पावसामुळे पिवळे पडले असून, फुले आणि पात्या गळतीमुळे पिकाची स्थिती चिंताजनक झाली. पेरणीपासून कपाशी पिकावर झालेला खर्चही वसूल होणार नव्हता, त्यामुळे आठ एकर कपाशी पिकावर रोटाव्हेटर फिरवला असल्याची माहिती अंदुरा भाग दोन शेतकरी गजानन ठाकरे, पाच एकर कपाशी पीक मोडल्याची माहिती शेतकरी गजानन पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली.
कापसाची शेती यावर्षी तोट्याची ठरली. लागलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता नसल्याने ५.५ एकर शेतातील कपाशीवर रोटाव्हेटर फिरवला. कर्जाचा डोंगर कायम असून, सरकारी मदत पदरात कधी पडेल, याकडे लक्ष लागले आहे.- मुरलीधर पाटील,शेतकरी हातरुण.