- संतोष येलकरअकोला: दगड गौण खनिजावरील स्वामित्वधनाच्या (रॉयल्टी) दरात करण्यात आलेल्या वाढीपैकी ५० टक्के दरवाढीस देण्यात आलेली स्थगिती रद्द करण्यात येत असल्याचा आदेश शासनामार्फत १९ जानेवारी राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला. त्यानुसार राज्यातील सर्वच जिल्ह्यांत दगड गौण खनिजाची ‘रॉयल्टी’ आता ४०० रुपये ब्रासप्रमाणे वसूल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.गत ११ मे २०१५ रोजीच्या शासन अधिसूचनेनुसार दगड गौण खनिजाच्या स्वामित्वधनाच्या (रॉयल्टी) दरात वाढ करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य खाण व क्रशर उद्योजक महासंघ व इतर जिल्हा संघटनांकडून ही दरवाढ कमी करण्याची मागणी केली होती. त्यानुषंगाने दगड गौण खनिजाच्या ‘रॉयल्टी’ दरवाढीपैकी ५० टक्के दरवाढ स्थगित करण्यात येत असल्याचा आदेश गत ३ फेबु्रवारी २०१६ रोजी शासनामार्फत देण्यात आला होता. त्यामुळे रॉयल्टी दरवाढीपैकी ५० टक्के दरवाढीस स्थगिती देण्यात आल्याने दगड गौण खनिजाच्या रॉयल्टीचे दर प्रतिब्रास ३०० रुपये करण्यात आले होते; परंतु शासनाच्या अधिसूचनेनुसार दगड गौण खनिज ‘रॉयल्टी’चे उचित असल्याचे आढळून आल्याने, दगड गौण खनिजावरील ‘रॉयल्टी’च्या दरवाढीपैकी ५० टक्के दरवाढीला देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात येत असल्याचा आदेश राज्य शासनाचे अवर सचिव दिनेश चव्हाण यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाºयांना १९ जानेवारीच्या पत्रान्वये दिला. ‘रॉयल्टी’च्या दरवाढीपैकी ५० टक्के दरवाढीवरील स्थगिती रद्द करण्यात आल्याने दगड गौण खनिजाच्या ‘रॉयल्टी’चे दर आता ४०० रुपये प्रतिब्रास असे झाले आहेत. त्यानुसार खदानधारकांकडून दगड गौण खनिजाची ‘रॉयल्टी’ वसूल करण्याची प्रक्रिया राज्यातील सर्व जिल्हा खनिकर्म अधिकाºयांमार्फत सुरू करण्यात आली आहे.
खदानधारकांकडून फरकाची रक्कम होणार वसूल!दगड गौण खनिजावरील ‘रॉयल्टी’च्या दरवाढीपैकी ५० टक्के दरास स्थगिती देण्यात आल्यापासून स्थगिती उठविण्यात आल्याच्या कालावधीतील ‘रॉयल्टी’ दरवाढीच्या फरकाची रक्कम जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयांमार्फत संबंधित खदानधारकांकडून वसूल करण्यात येणार आहे.
शासन आदेशानुसार दगड गौण खनिजावरील ‘रॉयल्टी’च्या दरवाढीस देण्यात आलेली स्थगिती रद्द करण्यात आली आहे. त्यानुसार दगड गौण खनिजावर प्रतिब्रास ४०० रुपयेप्रमाणे ‘रॉयल्टी’ आकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.-डॉ. अतुल दोड,जिल्हा खनिकर्म अधिकारी, अकोला.