अकोला : रेल्वेत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) २०२२-२०२३ या आर्थीक वर्षात सर्वच आघाड्यांवर जोरदार कामगिरी केली आहे. भूसावळ विभागात आरपीएफने वर्षभरात घरातून पळालेल्या व बेपत्ता झालेल्या २७३ मुलांना ताब्यात घेऊन, त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. यामध्ये १५३ मुले व १२० मुलींचा समावेश आहे. गत आर्थिक वषृात २०३ बेपत्ता बालकांना पालकांच्या स्वाधिन करण्यात आले होते.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बलाची महत्त्वाची भूमिका असून, भुसावळ विभागातून धावणाऱ्या अनेक सुपरफास्ट गाड्यांना शस्त्रधारी रेल्वे सुरक्षा बलाची सुरक्षा पुरविण्यात येत आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बहुतांश स्टेशनवर सीसीटीव्हीची यंत्रणा बसविण्यात आली असून, यामुळे गैरप्रकाराच्या घटना तत्काळ उघडकीस येण्यास मदत होत आहे. भुसावळ विभाग रेल्वे सुरक्षा बलाने गेल्या वर्षभरात विविध गुन्हे उघडकीस आणले आहेत. गेल्या वर्षी धावत्या गाडीची साखळी ओढल्याप्रकरणी ८४७ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली.
धावत्या गाडीत विनापरवाना खाद्यपदार्थ विक्री विक्री करणाऱ्या ८ हजार ७०३ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. रेल्वेगाडीतही महिलांच्या छेडछाडीच्या घटना घडत असून, अशा प्रकारे छेडछाड करणाऱ्या ‘मेरी सहेली ऑपरेशन’अंतर्गत ८३ प्रवाशांवर कारवाई केली. तसेच रेल्वेची सिग्नल यंत्रणेची केबल चोरीप्रकरणी वर्षभरात ५२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
गेल्या वर्षभरात भुसावळ विभागातील विविध स्टेशनवरून तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या ५७ दलालांना अटक करण्यात आली. ही सर्व कारवाईची प्रक्रियाडीआरएम एस. एस. केडिया, सीनिअर डीसीएम डॉ. शिवराज मानसपुरे व रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त श्रीनिवास राव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असल्याचे रेल्वे सुरक्षा बलातर्फे सांगण्यात आले.