अकोला : पाऊस व पुरामुळे जिल्ह्यात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत वाटपाच्या दुसऱ्या टप्प्यात २ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त २४ हजार ३४९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १४ कोटी ६१ लाख ५१ हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली असून, उर्वरित १० हजार ३१२ शेतकऱ्यांना मदत वाटपाची प्रक्रिया प्रशासनामार्फत सुरू आहे.
या वर्षीच्या पावसाळ्यात गत जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत सतत पाऊस व पुरामुळे जिल्ह्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मूग, उडीद पिकाचे उत्पादन बुडाले तर सोयाबीन, कपाशी, तूर व ज्वारी इत्यादी पिकांचे नुकसान झाले. हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पिकांचे नुकसान झालेल्या अतिवृष्टीग्रस्त ६८ हजार ६६१ शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत मदतनिधीची शासनाकडे मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने मदत वाटपाच्या पहिल्या टप्प्यात शासनामार्फत २५ कोटी ७८ लाख ७२ हजार रुपयांचा मदतनिधी प्राप्त झाला होता. उपलब्ध मदतीची रक्कम जिल्ह्यातील ३४ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. त्यानंतर मदत वाटपाच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील ३४ हजार ६६१ शेतकऱ्यांना मदत वाटपासाठी शासनामार्फत २५ कोटी ७८ लाख ७२ हजार रुपयांचा मदतनिधी शासनामार्फत गत महिन्यात प्राप्त झाला. ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालानंतर उपलब्ध मदतीची रक्कम अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमार्फत सुरू करण्यात आली. २ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील २४ हजार ३४९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १४ कोटी ६१ लाख ५१ हजार रुपये मदतीची रक्कम जमा करण्यात आली असून, जिल्ह्यातील उर्वरित अतिवृष्टीग्रस्त १० हजार ३१२ शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया प्रशासनामार्फत सुरू आहे.
जिल्ह्यात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत वाटपाच्या दुसऱ्या टप्प्यात २ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त २४ हजार ३४९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १४ कोटी ६१ लाख ५१ हजार रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे. उर्वरित अतिवृष्टीग्रस्त १० हजार ३१२ शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी