लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के प्रवेशाच्या शुल्काची अकोला जिल्ह्यातील शाळांसाठी सुमारे २ कोटी रुपयांच्या प्रतिपूर्तीची रक्कम लवकरच मिळणार आहे. यासंदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालयाने तसा दुजोरा दिला आहे. जिल्ह्यात आरटीई अंतर्गत २0७ शाळा नोंदणीकृत आहेत.शिक्षण हक्क कायद्याच्या तरतुदीनुसार खासगी शाळांमध्ये दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येत आहेत. या राखीव जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक आहे. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या खर्चाची रक्कम हे राज्य शासन देत असते; परंतु गत काही वर्षांपासून शासनाने आरटीई प्रतिपूर्तीची रक्कम जिल्ह्यातील शाळांना दिली नाही. त्यामुळे खासगी शाळांनी यंदा विद्यार्थ्यांना २५ टक्के जागांवर प्रवेश देणार नसल्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर शिक्षण विभागाने शाळांना प्रतिपूर्ती रक्कम देण्याचे मान्य केले होते. ही रक्कम देण्यासाठी सातत्याने शाळांकडून मागणी करण्यात येत होती. शैक्षणिक वर्ष २0१८-१९ ची प्रवेश शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम थकीत होती. आता शासनाने निधी मंजूर केला असून, त्या त्या जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे हा निधी वर्ग केला आहे. अकोला जिल्ह्यात आरटीई अंतर्गत नोंदणी झालेल्या २0७ शाळा आहेत. या शाळांना प्रतिपूर्ती रक्कम लवकरच देण्यात येणार आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी निधीचे वितरण करावेशासनाने जिल्ह्यातील खासगी इंग्रजी, मराठी माध्यमांच्या शाळांसाठी २ कोटी १0 लाख ६0 हजार रुपये प्रतिपूर्ती रक्कम मंजूर केली आहे. मंजूर झालेल्या निधीचे शाळांना तातडीने वितरण करण्याची मागणी शाळा संचालकांनी केली आहे.
अकोला जिल्ह्यातील शाळांना ‘आरटीई’ प्रतिपूर्तीची दोन कोटी रुपये मंजूर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 1:20 PM