अकोला : यंदा सोयाबीनला सोन्याचे दिवस आल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. कधी नव्हे तेवढा विक्रमी दर सोयाबीनला मिळत आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे दर ९ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले असून, गत १५ दिवसांमध्ये दोन हजार रुपयांनी दरवाढ झाली आहे.
जिल्ह्यात सव्वादोन लाख हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड करण्यात येत असते. चांगले उत्पन्न मिळत असल्याने दरवर्षी या क्षेत्रात वाढ होत आहे; परंतु यंदाचे वर्ष सोयाबीन उत्पादकांचे परीक्षा घेणारे वर्ष ठरले आहे. गत खरिपात अतिवृष्टीमुळे सोयाबीन खराब झाले व बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवले नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे उत्पादनात मोठी घट आली. सुरुवातीला तीन ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल दरात शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले; मात्र नंतर सोयाबीनच्या दरात दिवसागणिक वाढ होत आहे. हातात शेतमाल नाही, पण सोयाबीनच्या दरात विक्रमी वाढ होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात सोयाबीनचा दर ९ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मागील १५ दिवसांमध्ये या दरात २ हजार रुपयांनी वाढ झाली; मात्र या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना होणार नसून व्यापाऱ्यांना होणार असल्याचे दिसून येते.
असे वाढले दर
तारीख दर (प्रति क्विंटल)
१५ जुलै ७५००
१६ जुलै ८०००
२६ जुलै ८४००
२८ जुलै ९३००
३१ जुलै ९५००
कृत्रिम तेजी असल्याचा अंदाज
पावसाळा सुरू असल्याने शेतकऱ्यांजवळ शेतमाल शिल्लक नाही; मात्र मागील महिनाभरात सोयाबीनचे दर झपाट्याने वाढत आहे. ही कृत्रिम तेजी असल्याचे काही व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.