अकोला: जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा खर्च भागविण्यासाठी आणखी २९ लाख ७० हजार रुपयांचा निधी शासनामार्फत १३ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. उपलब्ध निधी जिल्ह्यातील तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील मुदत संपलेल्या सातही तालुक्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये दहा ग्रामपंचायती अविराेध झाल्याने २१४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदान घेण्यात आले असून, निवडणुकांचे निकाल १८ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आले. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा खर्च भागविण्यासाठी प्रती ग्रामपंचायत ४९ हजार रुपयेप्रमाणे शासनाकडून निधी देण्यात येतो. त्यानुसार जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा खर्च भागविण्यासाठी १ कोटी ९ लाख ७६ हजार रुपयांचा निधी प्राप्त होणे अपेक्षित आहे. त्यापैकी ३६ लाख रुपयांचा निधी शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत यापूर्वी प्राप्त झाला होता. त्यानंतर आणखी २९ लाख ७० हजार रुपयांचा निधी शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत १३ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. उपलब्ध निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांना निवडणुकांचा खर्च भागविण्यासाठी वितरित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा खर्च भागविण्यासाठी आवश्यक निधी मागणीच्या तुलनेत १३ जानेवारीपर्यंत ६५ लाख ७० हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला असला तरी, उर्वरित ४४ लाख ६ हजार रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त होणे अद्याप बाकी आहे.