पातूर: जनसुविधा योजनेअंतर्गत तालुक्याला ४६ लक्ष रुपयांचा निधी मिळाला होता; मात्र हा निधी अखर्चित राहिल्याने ४६ लाख रुपये निधी परत गेला आहे. या मुद्यावरून प्रश्न उपस्थित केल्याने पंचायत समितीची सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली. पंचायत समितीची सर्वसाधारण सभा गुरुवार, दि. ८ ऑगस्ट रोजी सभापती लक्ष्मीबाई जनार्धन डाखोरे यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले बचत भवनात पार पडली.
सभेला सभापती लक्ष्मीबाई जनार्धन डाखोरे, पंचायत समाज समिती सदस्य निमा अनिल राठोड, गोपाल ढोरे, ॲड. सूरज झडपे, नंदू सोळंके, अनिल इंगळे, श्याम ठाकरे यांची उपस्थिती होती. सभेचे कामकाज गट विकास अधिकारी राहुल शेळके यांनी पाहिले. यावेळी सर्व विभागाचे अधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते. आभार प्रदर्शन कृषी विस्तार अधिकारी अंकुश ठाकरे यांनी मानले.
------------
सर्वसाधारण सभेत या विषयांवर झाली चर्चा
सभेत मागील महिन्याची इतिवृत्त कायम करणे, ऑगस्ट २०२१चा जमा खर्च मंजुरी देणे, पंचायत समिती सेस फंडातील प्लास्टिक ताडपत्री योजनेसाठी लाभार्थी निवड करणे, शिक्षण विभागांतर्गत शाळेसाठी वर्षभरात सुट्ट्यांबाबत कार्य वृत्तांत मंजुरी देण्यात आली. कृषी विभागांतर्गत योजनेअंतर्गत लाभार्थीची निवड व विविध योजनेंसंदर्भात चर्चा करण्यात आली. पशुसंवर्धन विभागांतर्गत योजनेतील निवड झालेले लाभार्थी व किती लाभार्थींना लाभ दिला, यावर चर्चा करण्यात आली. घरकूल योजना, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत विहीर पुनर्भरण, जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामाबाबत तसेच ग्रामीण भागातील बस, पाणंद रस्ते, ग्रामीण रुग्णालय आदींबाबत चर्चा करण्यात आली.
-------------------
जनसुविधेंतर्गत तालुक्यातील एकूण ४६ लाख रुपये निधी परत गेला आहे. त्यामुळे तालुक्यात आलेला विकास निधी खर्च न झाल्यामुळे तालुक्याचा विकास रखडला असून, शासनाने तो निधी तातडीने परत करावा.
निमाताई अनिल राठोड, पंचायत समिती, पातूर.
----------------
निधी मार्च महिन्यात प्राप्त झाला होता. त्यानुसार ग्रामपंचायतीला काम सुरू करण्याचे निर्देश दिले होते, मात्र ग्रामपंचायतीने कामे सुरू केली नाहीत त्यामुळे ३१ मार्च २०२१ रोजी अखेरचा निधी वरिष्ठ कार्यालयाकडून खर्च न झाल्यामुळे परत मागविण्यात आला.
-शिंदे, शाखा अभियंता, पातूर.