अकोला: जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत १ कोटी १८ लाख रुपयांच्या निधीतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर कपाशी बियाणे वाटपाची योजना राबविण्यात आली असून, त्यामध्ये बियाणे खरेदी केल्याचे देयक सादर न केलेल्या शेतकऱ्यांना बियाणे वाटप योजनेच्या अनुदानाचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे जिल्हा परिषद कृषी विभागाच्या बियाणे वाटप योजनेत अनुदान वाटपाचे ४७ लाख रुपये मार्चअखेर अखर्चित राहिले आहेत.
जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर बीटी कपाशी बियाणे वाटपाची योजना राबविण्यात आली. जिल्हा परिषद सेस फंडातून १ कोटी १८ लाख रुपयांच्या निधीतून राबविण्यात आलेल्या या योजनेत जिल्ह्यातील ९ हजार १२ लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली होती. या योजनेत कपाशी बियाणे खरेदी केल्याच्या रकमेचे देयक सादर केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बियाणे अनुदानाची रक्कम जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत जमा करण्यात आली. परंतु, कपाशी बियाणे खरेदी केल्याच्या रकमेचे देयक कृषी विभागाकडे सादर न करू शकलेल्या जिल्ह्यातील अनेक लाभार्थी शेतकऱ्यांना बियाणे वाटप योजनेच्या अनुदानाचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे जिल्हा परिषद कृषी विभागाच्या अनुदानावरील कपाशी बियाणे वाटप योजनेंतर्गत उपलब्ध १ कोटी १८ लाख रुपयांच्या निधीपैकी मार्च अखेरपर्यंत अनुदान वाटपासाठी ७१ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असला तरी, उर्वरित ४७ लाख रुपयांची अनुदानाची रक्कम जिल्हा परिषद कृषी विभागाकडे अखर्चित राहिली आहे.
स्थायी समितीच्या सभेत
सदस्यांनी व्यक्त केली नाराजी !
शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर कपाशी बियाणे वाटपाच्या योजनेंतर्गत उपलब्ध १ कोटी १८ लाख रुपयांच्या निधीपैकी ४७ लाख रुपयांच्या अनुदानाची रक्कम अखर्चित राहिली असून, बियाणे खरेदीचे देयक सादर न करू शकलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदानाच्या लाभापासून वंचित राहावे लागले. त्यानुषंगाने या मुद्द्यावर शुक्रवारी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.