अकोला: कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कुटुंबांना अर्सेनिक अल्बम ३० औषध वाटप करण्यासाठी या औषधाच्या खरेदीकरिता शासनाच्या ९ डिसेंबर रोजीच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेला ५३ लाख ६७ हजार ७६४ रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. उपलब्ध निधीतून जिल्ह्यात ग्रामीण भागातील कुटुंबांना अर्सेनिक औषधाचे वाटप करण्यात येणार आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे राज्यातील ग्रामीण भागातील कुटुंबांना अर्सेनिक अल्बम ३० औषधाचे वाटप करण्यासाठी तेराव्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त अखर्चित निधी आणि चाैदाव्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधीच्या व्याजाची रक्कम राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानच्या राज्य प्रकल्प संचालक यांच्याकडे जमा करण्याच्या सूचना शासनाच्या ग्राम विभागाने २८ मे रोजीच्या पत्रानुसार राज्यातील जिल्हा परिषदांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार अकोला जिल्हा परिषदमार्फत १ कोटी ३० लाख ५४ हजार ४३७ रुपयांची रक्कम राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान राज्य प्रकल्प संचालकांच्या खात्यात जमा करण्यात आली होती. त्यानुषंगाने अर्सेनिक अल्बम ३० या होमियोपॅथी औषध खरेदीसाठी अकोला जिल्हा परिषदेला ५३ लाख ६७ हजार ७६४ रुपयांचा निधी वितरित करण्याचा आदेश शासनाच्या ग्राम विकास विभागाने ९ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानच्या राज्य प्रकल्प संचालकांना पत्राव्दारे दिला. त्यानुसार उपलब्ध निधीतून अर्सेनिक औषधाची खरेदी केल्यानंतर जिल्हा परिषदमार्फत जिल्ह्यात ग्रामीण भागातील कुटुंबांना अर्सेनिक औषधाचे वितरण सुरू करण्यात येणार आहे.
शासनामार्फत उपलब्ध निधीतून अर्सेनिक औषधाची खरेदी करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्ह्यात ग्रामीण भागातील कुटुंबांना औषधाचे वितरण सुरू करण्यात येणार आहे.
साैरभ कटियार
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद