अकोला: शिक्षण हक्क कायद्यानुसार जिल्ह्यातील आरटीई नोंदणीकृत शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया ५ मार्चपासून सुरू झाली. जिल्ह्यातील खासगी विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहायित २0७ शाळांमध्ये एकूण २३५६ राखीव जागा आहेत.बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज भरण्याचा कालावधी ५ ते २२ मार्चपर्यंत राहणार आहे. यंदा आरटीई प्रवेशासाठी २0७ शाळा पात्र ठरल्या आहेत. प्रवेशासाठी किमान वय ६ वर्ष 0 महिने १ दिवस ते ६ वर्ष ११ महिने २९ दिवस एवढे आहे. प्रवेश अर्ज आॅनलाइन मोबाईल अॅपद्वारेही भरता येणार आहेत. प्रवेश प्रकियेसंबधीची माहिती संकेतस्थळावर आहे. पालकांच्या काही अडचणी असल्यास, त्यांनी तालुकास्तरावर स्थापन केलेल्या मदत कक्ष समितीकडे संपर्क करावा आणि काही तक्रार असल्यास, तक्रार निवारण कक्षाकडे करावी. असे प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी कळविले. (प्रतिनिधी)