अकोला: शिक्षण हक्क कायद्याच्या (आरटीई) २५ टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिल्या फेरीत लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या जिल्ह्यातील १,८६५ पैकी केवळ १,३०० विद्यार्थ्यांचेच प्रवेश आतापर्यंत निश्चित झाले आहेत. पहिल्या मुदतवाढीनंतरही ५६५ विद्यार्थ्यांचे प्रवेश अजूनही प्रलंबित असून, या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आता दुसऱ्यांदा मिळालेली १० मेपर्यंतची मुदतवाढ दिलासा देणारी ठरणार आहे.आर्थिक दुर्बल व मागास घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा अधिकार देण्यात आला असून, या विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के मोफत प्रवेश राखीव ठेवण्यात आले आहेत. या अंतर्गत अकोला जिल्ह्यात २०७ शाळांमध्ये २ हजार ३७५ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेचा लाभ घेण्यासाठी ५ ते ३० मार्च या कालावधीत ६,४१४ पालकांनी आॅनलाइन अर्ज केले. त्यानंतर ९ एप्रिल रोजी लॉटर पद्धतीने विद्यार्थ्यांची १,८६५ निवड यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर ११ एप्रिलपासून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. यंदा कागदपत्रे पडताळणी समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीकडून छाननी झालेल्या विद्यार्थ्यांना निवड झालेल्या शाळांमध्ये प्रवेश देण्यात येत आहे. पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या पालकांना प्रवेश घेण्यासाठी ४ मेपर्यंतची मुदतवाढ दिली होती; मात्र या कालावधीमध्येही अनेकांना प्रवेश मिळाला नसल्याच्या तक्रारी शिक्षण संचालकांकडे करण्यात आल्या होत्या. या पृष्ठभूमीवर आरटीई प्रवेश प्रक्रियेस १० मेपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मुदत वाढीची ५६५ विद्यार्थ्यांना संधीप्रथम फेरीतील लॉटरी लागलेल्या पालकांना प्रवेश घेण्यासाठी १० मेपर्यंत दिलेल्या मुदतवाढीची अंतिम संधी उपलब्ध झाली आहे. या कालावधीत निवड झालेले; परंतु प्रवेश बाकी असलेल्या ५६५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.मुदतीत प्रवेश न झाल्यास दुसºया फेरीत संधी नाही!दिलेल्या कालावधीत प्रवेश निश्चित न केल्यास संबंधित पालकांची अर्ज निकाली काढण्यात येतील. निकाली काढण्यात आलेले अर्ज दुसºया फेरीसाठी ग्राह्य राहत नाही. त्यामुळे ज्या पालकांना पहिल्या फेरीत लॉटरी लागली आहे, त्यांनी बालकांचे प्रवेश तत्काळ निश्चित करून घेणे आवश्यक असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.