अकोला : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी विनाअनुदानित शाळांमधील २५ टक्के जागांवर प्रवेश मिळावा यासाठी राबविण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेची निवड यादी १२ एप्रिल रोजी जाहिर आली. त्यामध्ये जिल्ह्यातील १९२४ बालकांची लॉटरी लागली, मात्र आरटीई पोर्टलच्या तांत्रिक अडचणींमुळे १८ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात एकाही विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित झाला नाही.
जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केलेल्या १९० शाळांमध्ये राखीव १९४६ जागांसाठी ७११२ पालकांनी त्यांच्या पाल्यांसाठी अर्ज केले. राज्यस्तरावर ५ एप्रिल रोजी सोडत प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये १९२४ बालकांची निवड झाली. १२ एप्रिलला आरटीईच्या पोर्टलवर निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पालकांना मेसेज येण्यास प्रारंभ झाला.
बहुतांश पालकांना मेसेज प्राप्त झाला आहे. मात्र आरटीई पोर्टलच्या तांत्रिक अडचणीमुळे अलॉटमेंट लेटर आणि हमी पत्र डाऊनलोड करण्यास अडचण येत आहे. याशिवाय काहींना मेसेज प्राप्त झाले नसल्याने पोर्टलवर खात्री करण्यास देखील तांत्रिक अडथळा निर्माण होत आहे. परिणामी प्रवेश घेता येत नसल्याचे पालकांतून सांगितले जात आहे. त्यामुळे निवड यादी जाहीर झाल्याच्या दिवसापासून एकही प्रवेश निश्चित झाला नसल्याचे आरटीई पोर्टलवर दिसत आहे.
कागदपत्रांची पडताळणी सुरुमोफत प्रवेशासाठी शाळा निश्चित करण्याची डेडलाइन २५ एप्रिल आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात सोमवार, १७ पासून कागदपत्रे पडताळणीला सुरुवात करण्यात आली. कागदपत्रे पडताळणी झाल्यानंतर शिक्षण विभागामार्फत पालकांना कागदपत्रे पडताळणीची प्रत दिली जाते. ही प्रत निवड झालेल्या शाळेत दाखविल्यानंतरच मुलांचा प्रवेश निश्चित होतो. मात्र, आरटीई पोर्टलमध्ये तांत्रिक कारणांमुळे पालकांना अलॉटमेंट लेटर व पावती मिळण्यात अडचणी येत आहेत.