अकोला : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई)अंतर्गत विनाअनुदानित खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेशासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रक्रियेत गुरुवार, ४ मेपर्यंत जिल्ह्यातील निवड झालेल्या १,९२४ बालकांपैकी १११० बालकांचे प्रवेश निश्चित झाले, असून आता ८ मे या मुदतीपर्यंत उर्वरित ८१४ बालकांच्या प्रवेशाचे आव्हान आहे.
आरटीईअंतर्गत निवड झालेल्या बालकांना शाळेत प्रवेश निश्चित करण्यासाठीची मुदत ८ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. यामध्ये ५ मे रोजी बौद्ध पौर्णिमा व ७ मे रोजी रविसार अशी दोन दिवस सुट्टी आहे. त्यामुळे प्रत्यक्षात प्रवेश निश्चित करण्यासाठी केवळ तीन दिवसच शिल्लक आहेत. या तीन दिवसांमध्ये ८१४ बालकांच्या प्रवेश निश्चितीचे आव्हान असणार आहे.
आरटीईअंतर्गत जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या १९० शाळांमध्ये १,९४६ जागा राखीव आहेत. या जागांसाठी ७,११२ अर्ज प्राप्त झाले होते. राज्यस्तरावर काढण्यात आलेल्या सोडतीत जिल्ह्यातील १,९२४ बालकांची निवड झाली आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १३ एप्रिलपासून सुरू होऊन प्रवेशासाठी २५ एप्रिल ही अंतिम मुदत देण्यात आली होती. पहिल्या दिवसापासूनच आरटीई पोर्टलच्या तांत्रिक अडचणींमुळे प्रवेशनिश्चितीत खोडा निर्माण झाला होता. प्रवेशासाठीची २५ एप्रिल ही अंतिम मुदत जवळ आल्यानंतरही अनेक बालकांचा शाळा प्रवेश झाला नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर, शिक्षण संचालनालयाकडून ८ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आरटीई पोर्टलची तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर २० एप्रिलपासून प्रवेश प्रक्रियेला वेग आला. त्यानंतर, ४ मेपर्यंत जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये १११० बालकांचे प्रवेश निश्चित झाल्याची नोंद आरटीई पोर्टलवर आहे.