अकोला: ‘आरटीई’च्या २५ टक्के राखीव जागांसाठी राज्यातील इंग्रजी शळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अकोल्यात पहिल्या टप्प्यात इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळा प्रवेशाची १८६५ विद्यार्थ्यांना लॉटरी लागली आहे. २५ टक्के राखीव जागांसाठी जिल्ह्यातून ६ हजार ४१४ अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत. २३७५ जागांवर ही प्रवेश प्रक्रिया राबविल्या जाणार आहे.मुलांना इंग्रजी माध्यमाच्या आणि तेही नामांकित शाळेतच प्रवेश देण्यासाठी पालक आग्रही आहेत. त्यासाठी शासनाने वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी आरटीई कायद्यानुसार इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव केल्या आहेत. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क शासन भरणार आहे. त्यामुळे राखीव जागांसाठी पालकांमध्ये चांगलीच स्पर्धा सुरू झाली होती. २३७५ जागांसाठी जिल्हाभरातून सहा हजारांवर आॅनलाइन अर्ज प्राप्त झाले. आॅनलाइन अर्ज करून पालकांनी आपल्या परिसरातील इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांचे पर्याय दिले. राखीव जागांची पहिली सोडत जाहीर करण्यात आली असून, या सोडतीमध्ये पहिल्या टप्प्यात १८६५ विद्यार्थ्यांना ११ ते २६ एप्रिलपर्यंत दिलेल्या शाळेत प्रवेश घेता येणार आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाने एक समिती नेमली असून, या समितीमार्फत विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. दिलेल्या मुदतीत शाळेत प्रवेश न घेतल्यास पालकांना दुसऱ्या लॉटरी प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. हे पालक प्रवेश प्रक्रियेतून बाद होतील. (प्रतिनिधी)