अकोला: शिकाऊ परवान्यासाठी ३00 रुपयांची लाच स्वीकारताना आरटीओ कार्यालय परिसरातील एका एजंटला गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. एका तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे बुधवारी यासंदर्भात तक्रार केली होती. या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात सापळा रचला. तक्रारदाराने वाहनाचा शिकाऊ परवाना बनविण्यासाठी एजंट रमेश मारोती बोळे याला ३00 रुपयांची लाच देताच, एसीबीच्या अधिकार्यांनी त्याला रंगेहात पकडले आणि एसीबी कार्यालयामध्ये आणले. याठिकाणी त्याची चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने तक्रारदाराकडून घेतलेल्या ३00 रुपयांचे वाटप कसे-कसे होते याची माहिती एसीबीला दिली. त्याने सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मडके यांचे नाव घेतले असून, पोलिसांनी या एजंटकडून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संबंधित कागदपत्रेसुद्धा जप्त केली आहेत. एसीबीने या एजंटवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे कलम ८ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
लाच स्वीकाताना आरटीओ एजंट गजाआड
By admin | Published: October 31, 2014 1:29 AM